लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) नंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशाची तयारी तंत्रशिक्षण संचालनालयाने सुरू केली आहे. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना माहिती भरण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना त्याबाबत सविस्तर माहिती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांना माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण अंतर्गत मूल्यमापन आणि निकाल कसा लावला जाईल, तसेच बारावीच्या परीक्षेबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. यामुळे अकरावीसह, आयटीआय, तंत्रशिक्षण पदविकासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया कशी राबविली जावी याबाबत या प्राधिकरणांकडून ही कोणतीच पद्धती निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र यादरम्यान बारावी निर्णय झाल्यानंतर लगेचच प्रवेशप्रक्रियांची तयारी म्हणून तंत्रशिक्षण संचालनालयाने प्राथमिक तयारी सुरू केली आहे.
दहावी-बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना ही माहिती भरण्यासाठी संचालनालयाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना वेळोवेळी सूचना पाठविता येतील. संचालनालयाच्या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांकडून प्रवेशाबाबत समुपदेशन करण्यात येईल, अशी सूचना त्यावर दिली आहे. यात विद्यार्थ्यांचे नाव, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, जिल्हा, इच्छुक पदविका अभ्यासक्रम आणि अभिप्राय मागविण्यात आला आहे.
चौकट
हे आहेत अभ्यासक्रम :
- प्रथम वर्ष दहावीनंतरचा पदविका अभ्यासक्रम (तंत्रनिकेतन)
-थेट द्वितीय वर्ष दहावीनंतरचा पदविका (तंत्रनिकेतन)
- बारावीनंतर डी.फार्मसी
- इयत्ता बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी
- इयत्ता बारावीनंतर सरफेस कोटिंग तंत्रज्ञान