६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू

By संजय घावरे | Published: November 23, 2023 06:01 PM2023-11-23T18:01:32+5:302023-11-23T18:04:08+5:30

राज्यभरात ७५ ठिकाणी नव्या नाट्यगृहांची उभारणी करणार असल्याची माहिती सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Preliminary round of 62nd Maharashtra State Amateur Marathi Drama Competition begins in mumbai | ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू

मुंबई: मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर हे सांस्कृतिक कार्य विभागाचे एकमेव नाट्यगृह आहे. राज्यातील इतर सर्व नाट्यगृहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकारतर्फे ७५ ठिकाणी नवीन नाट्यगृहे बांधण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या उद्घाटन प्रसंगी दृक्‌श्राव्य माध्यमातून मुनगंटीवार यांनी संवाद साधला. 

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची नांदी झाली. मुंबई केंद्रावरील स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात गिरगावातील साहित्य संघ मंदिर येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, अभिनेते-दिग्दर्शक प्रमोद पवार, नाट्य अनुदान समिती सदस्या शैला सामंत, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य व अभिनेता मकरंद पाध्ये, अभिनेते आनंदा कारेकर, परीक्षक विनोद दुर्गपुरोहित, डॉ. समीर मोने, सुजाता गोडसे तर यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, अभिनेते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते व रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले तसेच परीक्षक वसंत सामदेकर, ईश्वर जगताप, प्राची गडकरी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराज पूजन करण्यात आले. त्यावेळी सर्व केंद्रावरील स्पर्धकांना दृक्‌श्राव्य माध्यमातून शुभेच्छा देताना मुनगंटीवार यांनी स्पर्धेच्या पारितोषिकांच्या मानधनामध्ये वाढ, परीक्षकांच्या मानधनामध्ये वाढ या बाबीही विचाराधीन असल्याचे सांगितले.

साहित्य संघ मंदिर येथे अभिनय साधना, मुंबई या संस्थेने 'मामला गडबड है!' तर यशवंत नाट्य मंदिर येथे इंम्पल्स नाट्य संस्था, मुंबई या संस्थेने सादर केलेल्या 'या वळणावर' या नाटकाने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात झाली. मुंबई केंद्रावरील प्राथमिक फेरीत यंदा ६० संघांचे सादरीकरण होणार असून, साहित्य संघ मंदिर आणि यशवंत नाट्य मंदिर येथे २८ डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता एका नाटकांचे सादरीकरण होईल.

सातत्याने आयोजित होणारी राज्य नाट्य स्पर्धा राज्यातील महत्त्वाची सांस्कृतिक चळवळ असून यातून अनेक महत्त्वाची नाटके आणि रंगकर्मी उदयास आले आहेत. या स्पर्धेची तिकिटे १५ रुपये आणि १० रुपये, अशा अतिशय अल्प दरात उपलब्ध असून कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले.

Web Title: Preliminary round of 62nd Maharashtra State Amateur Marathi Drama Competition begins in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई