आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा होणार सुरू
By मनोहर कुंभेजकर | Updated: March 17, 2025 17:26 IST2025-03-17T17:26:04+5:302025-03-17T17:26:30+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी-१ व टी-२ येथे येत्या दि,१ जून पासून प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा सुरू होणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा होणार सुरू
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी-१ व टी-२ येथे येत्या दि,१ जून पासून प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा सुरू होणार आहे. शिंदे सेनेचे जेष्ठ नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेतली.
अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानसेवा या टर्मिनलचा वापर करीत असल्यामुळे प्रवाश्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आजमितीस या दोन्ही टर्मिनलवर फक्त टॅक्सी प्रीपेड सेवा सुरू आहे. टॅक्सी चालकांना तासनतास वाट बघितल्यानंतर त्यांचा नंबर लागतो, अशातच विलेपार्ले, अंधेरी, सांताक्रुझ अशी जवळचे भाडे त्यांच्या वाट्यास आल्यास, त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. जवळच्या परिसरात जाण्यासाठी प्रवासी रिक्षास प्राधान्य देतात. विमानतळाबाहेर अनधिकृतपणे रिक्षा चालक व्यवसाय करीत असून प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक देखील करतात.
याठिकाणी प्रीपेड टॅक्सी सेवेप्रमाणेच प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी कीर्तिकर यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मे. अदानी एअरपोर्ट, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सर्व विभागांचे सकारात्मक अहवाल असताना देखील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी कार्यवाही करण्यास दिरंगाई करीत होते असा आरोप त्यांनी केला.
या विषयाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मंत्रालयातील दालनात संबंधित सर्व अधिका-यांसोबत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होऊन प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा दि, १ जून २०२५ पासून सुरू करण्यात येईल असे आश्वासन मंत्रीमहोदय यांनी दिले. सदर प्रीपेड ऑटो रिक्षा सेवेचे व्यवस्थापन स्थानिक ‘हॅप्पी टू हेल्प’ ही सामाजिक संस्था करण्यास तयार आहे.
या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, प्रादेशिक परिवहन विभाग अंधेरीचे अनिल पाटील, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे अश्विनी कुमार व हॅप्पी टू हेल्प संस्थेचे मकबूल मुजावर व इरफान शेख हे उपस्थित होते.