आठवीपासूनच जेईई, सीईटीची तयारी; कोचिंग क्लासेसचेही आता ‘कॉम्बो पॅकेज’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:35 AM2024-02-06T11:35:09+5:302024-02-06T11:35:26+5:30
लहान व मध्यम कोचिंग क्लासेसचेही आता ‘कॉम्बो पॅकेज’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सीईटीच्या तयारीसाठी आठवीपासून बारावीपर्यंतच्या कोचिंगसाठी एकत्रित (कॉम्बो) ‘पॅकेज’ देण्याचा मोठ्या क्लासचालकांपुरता मर्यादीत असलेला प्रकार आता मुंबईसह राज्यातील लहान व मध्यम स्वरूपाच्या कोचिंग क्लासेसमध्ये दिसू लागला आहे.
‘फाउंडेशन कोर्स’ म्हणून प्रचलित असलेल्या या प्रकारात आठवी किंवा नववीपासूनच बारावीपर्यंतच्या कोचिंगची हमी दिली जाते. प्रत्येक वर्षाची स्वतंत्रपणे फी भरण्याऐवजी चार ते पाच इयत्तांच्या तयारीकरिता पालकांकडून एकत्रित शुल्क घेतले जाते. त्यात जेईई, नीट, राज्यांच्या सीईटी यांची तयारी समाविष्ट असल्यास शुल्क आणखी वाढते. आतापर्यंत आयआयटीचे विद्यार्थी शिक्षक नेमणाऱ्या मोठ्या क्लासेसपुरताच हा प्रकार मर्यादित होता. मात्र, आता राज्यातील लहान व मध्यम स्वरूपाच्या क्लासेसमध्येही हा ट्रेंड दिसू लागला आहे. एरवी दीड ते दोन लाख रुपये शुल्क भरणाऱ्या पालकांचे अशा कॉम्बो पॅकेजमुळे २० ते ५० हजार रुपये वाचतात. शिवाय मुलांचा पाया पक्का होण्यास मदत होत असल्याची पालकांची भावना असल्याने नवा ट्रेंड मूळ धरू लागल्याची माहिती दि प्रोफेसर अकॅडमीचे राजेश कासट यांनी सांगितले. कोचिंग क्लासेस चालविणाऱ्यांमध्येही इंटिग्रेटेड, टायअप करणारे आणि त्याला विरोध करणारे असे दोन प्रकार आहेत.
कोरोनात मागे
कोरोनापूर्व काळातच हा प्रकार थोडाफार सुरू झाला होता. मात्र, कोराेनात लागलेल्या लॉकडाऊनमुळे क्लासचालकांचे कंबरडेच मोडले. तेव्हा फाउंडेशन कोर्सचा प्रकार मागे पडला होता. परंतु, आता तो पुन्हा सुरू झाल्याचे रिलायबल क्लासेसचे नरेंद्र भांबवानी यांनी सांगितले.
नवी नियमावली मुळावर
कोचिंग क्लासकरिता केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नव्या मार्गदर्शक नियमावलीमुळे मात्र चालक धास्तावले आहे. यात १६ वर्षांखालील मुलांच्या क्लासेसमधील प्रवेशावर निर्बंध घालण्याची सूचना करण्यात आली आहे.