Join us

मानवी अंतराळ मोहिमेची तयारी

By admin | Published: January 04, 2015 1:16 AM

मंगळ यान मोहीम यशस्वी ठरल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संघटना आता मानवी अंतराळ मोहिमेसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करीत आहे,

मुंबई : मंगळ यान मोहीम यशस्वी ठरल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संघटना आता मानवी अंतराळ मोहिमेसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करीत आहे, अशी माहिती इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. राधाकृष्णन यांनी शनिवारी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये दिली. वरिष्ठ अवकाश संशोधक प्रमोद काळे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यंत्रमानव अंतराळात पाठविणे आम्हाला शक्य झाले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान भारतात असून, आता मानवी अंतराळ मोहिमेसाठी गरजेचे असलेले तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जात असून, त्यासाठी काही टप्पे पूर्ण करायचे बाकी आहेत, असे ते म्हणाले. मानवाला अंतराळात पाठविण्यासाठी जीवरक्षक प्रणाली हवी, तसेच योग्य ते वातावरण मिळण्यास साहाय्यभूत ठरतील, अशा गोष्टींची गरज आहे. मानवी अंतराळ मोहीम अयशस्वी ठरू नये, यासाठीची तयारी तसेच अवघड प्रसंग उद्भल्यास त्यातून सुटका करून घेण्याचा मार्ग मिळावा, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान आणि अन्य सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. मंगळ यान मोहिमेत कोणती आव्हाने पेलावी लागली, याबद्दल सांगताना राधाकृष्णन म्हणाले की, ग्रहांची विशिष्ट स्थिती यामुळे अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे मंगळ यान मोहीम सुरू करण्यावर मर्यादा आल्या होत्या. परंतु मंगळ यान मोहीम चार वर्षे दोन महिने इतक्या विक्रमी वेळेत पूर्ण झाली. तसेच मंगळ यानाची चाचणी अवघ्या १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली. जवळपास सहा महिने मंगळ यान मोहीम सुरू राहील असा अंदाज आहे. मंगळाच्या परिघात मंगळ यानाच्या अस्तित्वास आताच १00 दिवस पूर्ण झाले असून, आणखी सहा महिने मंगळ यान मोहीम सुरू राहील. या मोहिमेतून कोणती उपयुक्त वैज्ञानिक माहिती मंगळ ग्रहाविषयी मिळेल याबाबत आताच काही सांगणे कठीण आहे, असे सांगून राधाकृष्णन म्हणाले की, मंगळ यानाकडून मिळत असलेली माहिती अतिशय उत्तम दर्जाची आहे. मंगळ यानाच्या प्रवासात येणारा संभाव्य धूमकेतूचा अडथळा दूर करण्यात यश मिळाले असून, आता जून महिन्याची वाट वैज्ञानिक पाहात आहेत. कारण जूनमध्ये तब्बल १५ दिवस मंगळ यानाचा इस्रो केंद्राशी असलेला संपर्क तुटण्याची शक्यता आहे. संपर्क तुटला आणि तो पुन्हा प्रस्थापित करता आला तर इस्रोच्या दृष्टीने मंगळ यान मोहिमेतील ते सर्वात महत्त्वाचे यश असेल, असेही के. राधाकृष्णन यांनी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)ग्लोबल वॉर्मिंग का वाढते आहे, विज्ञान म्हणजे काय, तंत्रज्ञान म्हणजे काय, रोबो नक्की कसे काम करतात, ड्रोन कसे उडते, या प्रश्नांची उत्तरे देण्यापासून अणुऊर्जेसह इस्त्रोच्या उल्लेखनीय कामगिरीचा धावता आढावा मुंबईकर घेत आहेत. निमित्त आहे ते इंडियन सायन्स काँग्रेसअंतर्गत वांद्रे पूर्वेकडील एमएमआरडीएच्या मैदानात आयोजित ‘प्राइड आॅफ इंडिया’ या विज्ञान प्रदर्शनाचे. हे सादरीकरण म्हणजे विज्ञानप्रेमींसाठी पर्वणीच आहे.केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते शनिवारी ‘प्राइड आॅफ इंडिया’चे उद्घाटन झाले असून, पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला विद्यार्थीवर्गासह मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, आण्विक ऊर्जा विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र होते. सुमारे २५० हून अधिक संस्था या प्रदर्शनातून सहभागी झाल्या आहेत. भारत सरकारच्या मेक इन इंडिया या उपक्रमाला अधोरेखित करणारा भव्य स्टॉल प्रदर्शनात उभारण्यात आला आहे. शिवाय कृषी, संरक्षण, आर्थिक जहाज, व्यावसायिक आदी विविध क्षेत्रांतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक साधने आणि सेवा, आगळेवेगळे संशोधन प्रकल्प यांचे दर्शन या प्रदर्शनाच्या माध्यमातून घडत आहे.