Join us  

महाशिवरात्रीच्या जत्रेची तयारी

By admin | Published: March 07, 2016 2:11 AM

शहराचे वैभव असलेले प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीसाठी सज्ज झाले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सोमवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम, जत्रा होणार आहे.

अंबरनाथ : शहराचे वैभव असलेले प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीसाठी सज्ज झाले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सोमवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम, जत्रा होणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नगरपरिषदेतर्फे सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. देशातील भूमिज शैलीतील अत्यंत प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. या मंदिरावर असलेली अनेक कोरीव शिल्पे या मंदिराच्या वैभवाची साक्ष देतात. महाशिवरात्रीला या मंदिराच्या परिसरात मोठी जात्रा भरते. त्यासाठी तसेच महादेवाच्या दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. दर्शनरांग मंदिरापासून उल्हासनगर कॅम्प-५पर्यंत जाते. त्यामुळे भाविकांना दर्शनरांगेत कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पाणी आणि प्रसादाची सोय केली जाणार आहे. तसेच उन्हाचा त्रास भाविकांना होऊ नये, यासाठी दर्शनरांगेच्या परिसरात मंडप टाकण्यात येणार आहे. दर्शनरांगेसाठी जाणारा आणि बाहेर पडणारा मार्ग वेगळा असणार आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. सेवाभावी संस्था आणि संघटनांच्या प्रसादवाटपाच्या स्टॉलवर नगरपरिषदेतर्फे मोफत पाण्याची सोय केली जाणार आहे. स्वामी समर्थ चौकापासून ते शिवमंदिर परिसरापर्यंत सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. (प्रतिनिधी)