मेट्रो १०, १२ साठी मोर्चेबांधणी, गायमुख-शिवाजीनगर, कल्याण-तळोजा मार्गाला चालना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 02:31 AM2020-07-08T02:31:47+5:302020-07-08T02:32:26+5:30

कल्याण-तळोजा हा २०.७ किमी लांबीचा मार्ग आहे. या मार्गिकेवर १७ स्थानके असून त्या कामासाठी ५ हजार ८६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका मेट्रो पाच आणि नवी मुंबई मेट्रोला जोडली जाणार आहे. तर, गायमुख ते शिवाजी चौक ही मार्गिका ९.२ किमी लांबीची असून त्यावर चार स्थानके असतील.

Preparation for Metro 10, 12, Gaimukh-Shivajinagar, Kalyan-Taloja route | मेट्रो १०, १२ साठी मोर्चेबांधणी, गायमुख-शिवाजीनगर, कल्याण-तळोजा मार्गाला चालना

मेट्रो १०, १२ साठी मोर्चेबांधणी, गायमुख-शिवाजीनगर, कल्याण-तळोजा मार्गाला चालना

googlenewsNext

मुंबई : कोरोना संकटामुळे मुंबई महानगर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामाची गती संथ झाली आहे. मात्र, या संकटामुळे भविष्यातील प्रकल्प लांबणीवर पडू नयेत यासाठी एमएमआरडीएचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच गायमुख ते शिवाजी चौक (मेट्रो-१०) आणि कल्याण ते तळोजा (मेट्रो-१२) या दोन महत्त्वाकांक्षी मार्गिकांसाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे. ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कल्याण-तळोजा हा २०.७ किमी लांबीचा मार्ग आहे. या मार्गिकेवर १७ स्थानके असून त्या कामासाठी ५ हजार ८६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका मेट्रो पाच आणि नवी मुंबई मेट्रोला जोडली जाणार आहे. तर, गायमुख ते शिवाजी चौक ही मार्गिका ९.२ किमी लांबीची असून त्यावर चार स्थानके असतील. मेट्रो ४ आणि मेट्रो ९ या मार्गिकांना ती संलग्न असेल. या मार्गिकेसाठी ४ हजार ४७६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही मार्गिकांची कामे आॅक्टोबर, २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गिकांवर अनुक्रमे ३ लाख ४२ हजार आणि २ लाख ६२ हजार प्रवासी दररोज प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. या कामांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांना दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मंजुरी दिलेली आहे. या मार्गिकांच्या कामांच्या प्राथमिक नियोजनापासून ते काम पूर्ण होईपर्यंत त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी सल्लागारांच्या खांद्यावर सोपविली जाणार आहे.

कामाची सर्व भिस्त सल्लागारांवर
या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सविस्तर आराखडे तयार करणे, या प्रकल्पांची आर्थिक सुसाध्यता तपासणे, कामांचे डिझाईन अंतिम करणे, कंत्राटदाराची निवड करण्यासाठी टेंडर डॉक्युमेंट तयार करणे, निविदा प्रक्रियेत सहकार्य करणे, निविदा प्रक्रियेतील वाटाघाटी करून पात्र कंत्राटदारांच्या नियुक्तीस मदत करणे, प्रकल्पातील सुरक्षितता, ऊर्जा संवर्धन, पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आदी सर्व आघाड्यांवर सविस्तर अभ्यास करून मार्गदर्शन करणे.
काम सुरक्षित पद्धतीने मार्गी लावण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविणे, कामाचा दर्जा तपासून कंत्राटदारांना पूर्ण झालेल्या कामानुसार देणी अदा करणे आदी प्रमुख कामांसह या दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएला आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची जबाबदारी या सल्लागारांवर असेल.

Web Title: Preparation for Metro 10, 12, Gaimukh-Shivajinagar, Kalyan-Taloja route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.