मुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच नवीन महाबळेश्वर गिरिस्थान निर्माण करण्याच्या प्रकल्पाने गती घेतली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पातील २३५ गावांचा बेस मॅप तयार केला आहे. आता या भागाची प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम सुरू झाले असून येत्या काही महिन्यांत ही विकास योजना तयार केली जाणार आहे.राज्यातील प्रमुख गिरिस्थानांमध्ये समावेश असलेल्या महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते. त्यातून येथील पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने महाबळेश्वरवर येणारा ताण कमी करण्यासाठी नवीन गिरिस्थान विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार कोयना बॅक वॉटर आणि परिसरातील तब्बल २३५ गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर वसविले जाणार आहे.यामध्ये सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश नवीन महाबळेश्वर प्रकल्पात करण्यात आला आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ‘एमएसआरडीसी’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून २०१९ मध्ये नियुक्ती केली होती. सातारा जिल्ह्यातील सुमारे ७४८ चौरस किमी क्षेत्रासाठी ही योजना तयार केली जात असून, सांगली जिल्ह्याच्या हद्दीपासून ते महाबळेश्वरपर्यंत हा परिसर विस्तारला आहे.‘एमएसआरडीसी’ने या भागाचा बेस मॅप तयार केला आहे. आता या भागातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत. या सूचनांच्या विचारात घेऊन विकास योजना तयार केली जाणार आहे. त्यातून ती सर्वसामावेशक बनण्यास मदत मिळेल, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, स्थानिकांना त्यांच्या सूचना मांडता याव्यात, यासाठी महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात २२ जुलैला, तर सातारा आणि पाटण तालुक्यात ३ जुलैला तालुकानिहाय गावांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
नवीन महाबळेश्वर काय आहे?नवीन महाबळेश्वरमधील परिसर हा सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. या भागातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात. तसेच कोयनेचे बॅक वॉटर आहे. यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे. त्याचबरोबर घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देण लाभली आहे. या भागातील पर्यटनस्थळांच्या परिसरात सोयीसुविधांचा विकास करून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. यातून या भागाचा विकास साधण्याचा ‘एमएसआरडीसी’चा मानस आहे.