जेजे स्कुल ऑफ आर्टमधील विद्यार्थिनी हॉस्टेलची सुविधा पुरविण्याची मुंबई विद्यापीठाची तयारी

By रेश्मा शिवडेकर | Published: June 26, 2024 09:58 PM2024-06-26T21:58:48+5:302024-06-26T21:59:20+5:30

आठवडाभरात ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्याचे आश्वासन

Preparation of Mumbai University to provide hostel facilities for students of JJ School of Art | जेजे स्कुल ऑफ आर्टमधील विद्यार्थिनी हॉस्टेलची सुविधा पुरविण्याची मुंबई विद्यापीठाची तयारी

जेजे स्कुल ऑफ आर्टमधील विद्यार्थिनी हॉस्टेलची सुविधा पुरविण्याची मुंबई विद्यापीठाची तयारी

मुंबई-स्वायत्त दर्जा मिळालेल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधील सुमारे ४० विद्यार्थिनींना हॉस्टेलची सुविधा पुरविण्याची तयारी मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने दाखविली आहे. मात्र हॉस्टेलसाठी विद्यापीठाकडून या वर्षी प्रथमच राबविली जाणारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी त्यांना हॉटेल किंवा नातेवाईकांच्या आश्रयाला राहावे लागणार आहे.

मुंबई विद्यापीठाने जेजेला स्वायत्तता मिळाल्याचे कारण आपल्या मादाम कामा गर्ल्ज हॉस्टेलमध्ये संस्थेच्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला होता. इथल्या अनेक मुली मराठवाडा, विदर्भातील असून गेली दोन-तीन वर्षे जेजेमध्ये विविध कला शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. 

वर्षानुवर्षे संस्थेतील विद्यार्थिनी या हॉस्टेलमध्ये राहत आल्या आहेत. मात्र कॉलेज सुरू झाले तरी हॉस्टेलमध्ये जागा न मिळाल्याने गेले १५ दिवस या मुली मुंबईत हॉटेल आणि नातेवाईकांच्या घरी आश्रयाला आहेत. हॉस्टेलच्या अधिक्षकांपासून ते मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपर्यंत अर्जविनंत्या केल्यानंतर आता कुठे विद्यापीठ प्रशासनाने त्यांना हॉस्टेलमध्ये जागा देण्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यासाठी त्यांना आणखी आठवडाभर तरी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मुंबई विद्यापीठाकडून यंदापासून सर्वच हॉस्टेलमधील प्रवेश प्रक्रिया समर्थ पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर विद्यापीठाची समिती विद्यार्थ्यांना हॉस्टेलच्या जागांचा वाटप करेल. ही प्रक्रिया साधारण आठवडाभर चालणार चालेल. त्यानंतर या विद्यार्थिनींच्या हॉस्टेल प्रवेशाचा प्रश्न सुटेल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली.

केवळ मादाम कामाच नव्हे तर विद्यापीठाच्या चर्चगेट, मरीन लाईन्स, कलिना येथील सर्वच वसतीगृहांमधील जागांचे वाटपही ऑनलाईन केले जाणार आहे. विद्यापीठाच्या काही विभागातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत अजिबातच हॉस्टेलची सुविधा मिळत नव्हती. त्यांनाही नवीन प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे.

-बळीराम गायकवाड

 

Web Title: Preparation of Mumbai University to provide hostel facilities for students of JJ School of Art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.