गणेश चतुर्थीचे; चाकरमान्यांची तयारी अंतिम टप्प्यात, ९ सप्टेंबरआधी गाव गाठण्यासाठी धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 09:22 AM2021-08-29T09:22:03+5:302021-08-29T09:22:14+5:30
गणेशोत्सवात कोकण रेल्वेचे तिकीट मिळवणे मोठे दिव्य असते.
मुंबई : गणेशोत्सव आणि कोकणवासीयांचे नाते अतूट असेच आहे. मुंबईत राहणारा चाकरमानी न चुकता चतुर्थीला गावी जातो. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाने त्यांची वाट खडतर केली असली, तरी काहीही करून ९ सप्टेंबरआधी गाव गाठण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली आहे. रेल्वेचे बुकिंग न मिळालेल्यांनी ट्रॅव्हल्स किंवा अन्य पर्यायांचा अवलंब केला आहे, तर गर्दीमुळे बाजारपेठांत निर्बंध लागू होण्याच्या धास्तीने बऱ्याच जणांनी सामानाची जमवाजमव सुरू केली आहे.
गणेशोत्सवात कोकण रेल्वेचे तिकीट मिळवणे मोठे दिव्य असते. त्यात यंदा रेल्वेफेऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे बहुतांश चाकरमान्यांना ट्रॅव्हल्सवर अंवलंबून रहावे लागले आहे. याचा फायदा घेत ट्रॅव्हल्सवाल्यांनी भाडे दुपटीहून अधिक वाढवले आहे. तर दुसरीकडे लसीकरण पूर्ण न झालेल्यांना प्रवासाआधी ७२ तास कोरोना चाचणी करावी लागणार आहे. त्याचा अतिरिक्त भार माथी पडणार असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी बराच खर्चिक ठरणार आहे.
येत्या दोन-तीन दिवसांत बाजारपेठांत गर्दी वाढणार असल्याने आधीच सामानाची जमवाजमव करून ठेवली. मुलांसाठी कपडे, देवसामान, सजावटीचे सामान लालबागहून आणले. आता फक्त बॅगा भरा आणि गावची वाट धरा, बस्स!
- प्रवीण देसाई, चाकरमानी
ट्रॅव्हल्सवाल्यांनी ८०० वरून थेट दीड हजारांवर तिकीट नेले आहे. त्यात कोरोना चाचणीचा अतिरिक्त खर्च. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव न परवडणारा आहे.
- केशव नाईक, चाकरमानी
कोरोना चाचणीची डोकेदुखी माथी मारल्याने चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. चतुर्थीच्या तोंडावर आणखी काही नियम लागू करू नका. आम्ही कोरोना पसरवायला नव्हे, तर देवाची सेवा करायला आणि घरच्या माणसांची सुख-दुःखे वाटून घ्यायला जात आहोत.
- अभिजित परब, चाकरमानी
यंदा रेल्वेच्या फेऱ्या खूपच कमी आहेत. त्यामुळे रस्तेमार्गावर ताण वाढल्याने ७ ते १० सप्टेंबरदरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी होणार आहे. हे लक्षात घेऊन ५ सप्टेंबरला गावी जायचे नियोजन केले आहे. - राजन गवस, चाकरमानी
अवाजवी भाडेवाडीकडे परिवहनमंत्र्यांनी लक्ष देऊन ट्रॅव्हल्सच्या दरांवरील नियंत्रणासाठी उपाययोजना केली पाहिजेत.
- बाळा आडिवरेकर, चाकरमानी