मुंबई- वरील फोटो पाहून कुणालाही दादरच्या फुल बाजाराची आठवण होईल. तिथलं चित्र डोळ्यापुढे उभं राहील. पण, हा फोटो विधानभवनाच्या बाहेरचा आहे आणि म्हणूनच हे दृश्य थोडं काळजीचं आहे, गंभीर आहे.
राज्याचं कायदेमंडळ असलेल्या विधानभवनात मंत्र्यांची, आमदारांची आणि बड्या अधिकाऱ्यांची ये-जा सुरू असते. स्वाभाविकच, तिथली सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट आहे. सामान्य माणसाला या वास्तूच्या आसपास फिरकायचं तरी दहा जणांना मिनतवाऱ्या कराव्या लागतात. आत प्रवेश मिळणं तर महाकठीण गोष्ट. असं असताना, विधानभवन परिसरात फुलबाजार भरलेला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर असलेलं हे चित्र पाहून, हा लग्नमंडप आहे किंवा डेकोरेशनचं दुकान आहे, असं कुणालाही वाटेल. पण ही सगळी तयारी सुरू आहे, ती पलूस-कडेगाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विश्वजित कदम यांच्या शपथविधी सोहळ्याची. या कार्यक्रमासाठी सुरक्षा थोडी सैल सोडल्याचं पाहायला मिळतंय.
विधानभवनाच्या परिसरात प्रवेश करण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या दहा गोष्टी तपासल्या जातात. तसंच अधिकृत ओळखपत्राशिवाय कुणालाही तेथे प्रवेश दिला जात नाही. पण आता विधानभवनाच्या मागील गेटवर सकाळपासून फुलांचं डेकोरेशन सुरू आहे. त्यासाठी आठ ते दहा कामगार काम करत आहेत. या कामगारांना विधानभवन परिसरात प्रवेश कसा मिळाला, त्यांची ओळखपत्रं तपासली का, असा प्रश्न विचारला जातोय.