मुख्यमंत्री; मालाड येथील कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून, आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे सांगितले.
एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण सोमवारी मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून, सध्या जरी बेड्स रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर्समधील बेडची संख्या वाढविण्यासोबतच चार नवीन कोविड सेंटरही सुरू केली जाणार आहेत. मालाड जम्बोसह दुसऱ्या टप्प्यामध्ये कांजूरमार्ग, सायन, वरळी रेसकोर्स ही नवीन जम्बो सेंटर सुरु केली जाणार आहेत. तर नेस्को, रिचर्डसन ऍण्ड क्रूडास भायखळा आणि एनएससीआयमधील बेडची संख्या वाढवली जात आहे.
* ८,३२० बेड उपलब्ध होत
- जम्बो कोविड सेंटर्सच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक म्हणजे ८,३२० इतके बेड उपलब्ध होत आहेत. यात ७० टक्के म्हणजे ५,९८६ ऑक्सिजन बेड तर १,१४० आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र असे ६०० ऑक्सिजन व १५० आयसीयू बेड आहेत.
- पहिला आणि दुसरा असे दोन्ही टप्पे मिळून जम्बो कोविड सेंटर्समधील एकूण बेडची संख्या आता १५ हजार ६२७ होते आहे. त्यात ९,१९३ ऑक्सिजन बेड, १,५७२ आयसीयू बेड आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी एकूण १,२०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि १५० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील.
- जम्बो सेंटर्सच्या संख्येमध्ये जर महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, सेव्हन हिल्स हॉस्पिटल यांची बेरीज केली तर आता एकूण बेड्सची संख्या ही १९ हजार ९२८ म्हणजे जवळपास २० हजार इतकी होते आहे.
-------------------------------------------