मुंबई: ‘मनी लॉड्रिंग’च्या आरोपावरून नोंदविलेल्या गुन्ह्यात प्रत्यक्ष हजर राहून जबानी देणे तूर्त शक्य नसल्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे परदेशातून जबानी देण्याची तयारी असल्याचे वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झकिर नाईक याने अंमलबजावणी संचालनालयास (ईडी) कळविले आहे.‘ईडी’ने हजेरीसाठी पाठविलेल्या समन्सला अॅड. महेश मुळे यांच्याकरवी पाठविलेल्या पत्रात झकिर नाईक याने प्रत्यक्ष हजेरीसाठी आणखी काही महिन्यांची मुदत मागत असतानाच स्कायपे किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जबानी देण्याची आपली तयारी असल्याचे म्हटले आहे.‘ईडी’ने झकिर नाईकला ९ फेब्रुवारी रोजी जबानीसाठी हजर राहण्याचे समन्स काढले होते. पण झकिर नाईक म्हणतो की, मी एनआरआय असल्याने मला कोणतेही समन्स मिळाले नाही. मात्र माझ्या भावाला पाठविलेल्या समन्सच्या आधारे मी हे कळवत आहे. असे असले तरी मला समन्स मिळाले असे मानले जाऊ नये.नाईक याने स्थापन केलेल्या ‘इस्लामिक रीसर्च फाऊंडेशेन’चा (आयआरएफ) दहशतवादी कारवायांशी संबंध जोडून केंद्र सरकारने बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. पण नाईक म्हणतो की, बंदीच्या या निर्णयास आपण याच कायद्याखालील न्यायाधिकरणाकडे आव्हान दिले असल्याने त्याचा निकाल होईपर्यंत ‘आयआरएफ’च्या अनुषंगाने आपल्याला कोणत्याही चौकशीसाठी बोलाविले जाऊ नये.गेल्या वर्षी ढाका येथील एका उपाहारगृहावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पकडलेल्या आरोपींनी आपण नाईक याच्या प्रवचनांमधून स्फूर्ती घेतल्याचा दावा केल्यापासून नाईक याच्यामागे भारतात कायद्याचा ससेमिरा सुरु झाला आहे. तेव्हापासून तो सौदी अरबस्तानात असल्याचे मानले जाते. नाईकविरुद्ध प्रक्षोभक भाषणे करण्याखेरीज बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये गुुन्हा नोंदविण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)माझ्याविरोधात प्रक्षोभक वातावरणसध्या माझ्याविरुद्ध भारतात फार प्रक्षोभक वातावरण आहे व अशा वातावरणात निप्ष्पक्ष तपास कोणे शक्य नाही, असा दावाही नाईक याने केला. दोनच दिवसांपूर्वी ‘ईडी’ने आमिर गझधर या नाईक याच्या निकटच्या सहकाऱ्यास अटक केली होती.
इलेक्ट्रॉनिक जबानीस झकिर नाईकची तयारी
By admin | Published: February 22, 2017 4:38 AM