मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:03 AM2024-11-22T11:03:23+5:302024-11-22T11:04:36+5:30
मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले असून प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई : शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून ३६ मतमोजणी केंद्रांवर दोन हजार ७०० कर्मचारी मतमोजणीचे काम पाहतील. सुरक्षेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मिळून १० हजार पोलिस तैनात केले जाणार आहेत. मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना शुक्रवारीही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले असून प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील मिळून एकूण ३६ मतदारसंघांसाठी ३६ केंद्रांवर मतमोजणी होईल.
मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता प्रशासनाने मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यासाठी तयारी केली आहे. दुसरीकडे उमेदवारांनी देखील निकालानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अनेकांनी विजयी रॅलीचे नियोजन केले आहे.
प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी...
मतदारसंघानुसार, निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक, सहायक कर्मचारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षेसाठी पोलिस दलासोबत अन्य यंत्रणांचेही मनुष्यबळ तैनात केले आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या आहेत.
मतमोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोनवेळा प्रशिक्षण देण्यात येत आहे. १५ नोव्हेंबरला पहिल्यांदाचा प्रशिक्षण देण्यात आले तर, शुक्रवारी पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुंबई शहरात ५२.६५ % मतदान
मुंबई शहर जिल्ह्यात बुधवारी एकूण ५२.६५ टक्के मतदान झाले. गेल्यावेळेपेक्षा ते दीड टक्क्याने अधिक आहे. शहर जिल्ह्यातील १० मतदारसंघात २५ लाख ४३ हजार ६१० मतदार आहेत.
यापैकी एकूण १३ लाख ३९ हजार २९९ नागरिकांनी मतदान केले.
१३ लाख ६५ हजार ९०४ पुरुषांपैकी ७ लाख १० हजार १७४ पुरुषांनी मतदान केले. तर, एकूण ११ लाख ७७ हजार ४६२ महिलांपैकी ६ लाख २९ हजार ०४९ महिलांनी मतदान केले. इतर २४४ मतदारांपैकी ७६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
उपनगरावर दृष्टिक्षेप
मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५६.३९ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण २६ मतदारसंघांत मिळून एकूण ७६ लाख ८६ हजार ०९८ मतदार आहेत. यापैकी एकूण ४३ लाख ३४ हजार ५१३ नागरिकांनी मतदान केले.
४१ लाख १ हजार ४५७ पुरुषांपैकी २३ लाख ५८९ पुरुष मतदारांनी मतदान केले. तर, एकूण ३५ लाख ८३ हजार ८०३ महिलांपैकी २० लाख ३३ हजार ६५४ महिलांनी मतदान केले. इतर ८३८ मतदारांपैकी २७० जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतमोजणी केंद्रावर वैद्यकीय मदत कक्ष, रुग्णवाहिका, अग्निशमन दल
मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतमोजणीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून मतमोजणी केंद्रांवर स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष तयार करण्यात आला आहे.
या कक्षात आवश्यक औषधांचा साठा, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी तसेच रुग्णवाहिकाही असणार आहे. त्याचबरोबर मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्षासह राजकीय प्रतिनिधींसाठी चौकशी कक्ष स्थापन केला जात आहे.
अग्निशमन दलाचे बंबही तेथे सज्ज ठेवले जाणार आहेत. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष असणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.