Join us  

उत्तर मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी सुरू, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल सहभागी होणार

By मनोहर कुंभेजकर | Published: June 19, 2024 2:40 PM

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबईत सार्वजनिकरित्या विविध ठिकाणी योगाचे कार्यक्रम आयोजित करणार आहे

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबईत सार्वजनिकरित्या विविध ठिकाणी योगाचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. प्राथमिक तयारी म्हणून काल केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे नवनिर्वाचित खासदार पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी कार्यक्रमांची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी दिली. 

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या बैठकीत सांगितले की, "आंतरराष्ट्रीय योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगभर मान्यता मिळवून दिली आहे आणि याचा भारताला अभिमान आहे.उत्तर मुंबईत  योग उत्सव मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची योजना त्यांनी मांडली.तसेच आंतरराष्ट्रीय योग दिन उत्तर मुंबईच्या विधानसभेच्या सर्व सार्वजनिक उद्यानांमध्ये तसेच प्रभागांमध्ये एकत्रितपणे व सार्वजनिकरित्या साजरा करण्यात यावा, असेही सांगण्यात आले.

२१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता कांदिवली पश्चिम चारकोप मार्केट येथे आयोजित योगा ऑन स्ट्रीट कार्यक्रमाला ते स्वतः उपस्थित राहून नागरिकांसोबत योगाभ्यास करणार आहेत. भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई आणि चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योगा ऑन स्ट्रीट कार्यक्रमात चारकोप मार्केटजवळील भगवती हॉटेलसमोर पतंजली योगपीठ आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योगगुरू मार्फत योगाभ्यास दाखवले जाणार आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले जाईल अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील अंकम यांनी दिली. 

तसेच बोरिवली विधानसभेच्या कोर केंद्र डोम येथे योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पोयसर जिमखाना संस्थेतर्फेही योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला आमदार भाई गिरकर, विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर, आ.अतुल भातखळकर, आ.योगेश सागर, आ.मनिषा चौधरी, आ.सुनील राणे यांनीही आपापल्या भागात होणाऱ्या योग कार्यक्रमाची माहिती दिली.

टॅग्स :पीयुष गोयलयोगासने प्रकार व फायदे