Join us  

'जयदीप आपटेच्या जामिनाची तयारी आधीपासूनच सुरू होती'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 12:17 PM

Maharashtra Politics : जयदीप आपटे याला काल कल्याण येथून अटक करण्यात आली आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही दिवसापूर्वी कोसळल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता, गेल्या काही दिवसापासून आपटे फरार होता. दरम्यान, काल आपटे याला कल्याण येथून अटक करण्यात आली आहे. अटकेवरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. 

शरद पवार, काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गट मवाळ; CM पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. "मी वारंवार म्हणत होतो जयदीप आपटेच्या मागे जी शक्ती आहे. ती शक्ती मंत्रालयात आहे, ती शक्त वर्षा बंगल्यावर आहे, मालवणात आहे. त्यांच्यामुळे इतके दिवस जयदीप आपटे हे पोलिसांना चुकवू शकले. पण अखेर शिवभक्त यांचा दबाव आणि रेटा होता की त्याला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. जयदीप आपटे यांच्यापेक्षा ज्याने त्यांना हे काम दिलं ते बेकायदेशीर होतं, ते सूत्रधार आजही सरकार मध्ये आहेत,असा आरोपही खासदार राऊत यांनी केला. 

"जयदीप आपटेला अटक होण्याआधी सिंधुदुर्ग कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू होती. त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हालत होते, मी वारंवार ठाण्याच्या उल्लेख करत आहे, असा गौप्यस्फोटही राऊतांनी केला. 

'कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला'

संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने बाजार मांडला आहे, या सगळ्या षडयंत्राचे सूत्रधार ठाण्यामध्ये आहेत. यात आम्ही राजकारण करू इच्छित नाही. लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला. तो कोणालातरी पाठीशी घालण्यासाठी झाला. या संपूर्ण कामात भ्रष्टाचार झालेला आहे. आमचा विरोध आणि लढा त्यासाठी आहे. कोट्यवधी रुपयांचे काम टेंडर माध्यमातून काढले प्रत्यक्ष काम, २०-२५ लाखात काढले, असंही राऊत म्हणाले. 

मुख्यमंत्री म्हणतात ४५ किलोमीटर ताशी वाऱ्याच्या वेगामुळे पुतळा कोसळला. हे सरकार महाराजांच्या नावाने भ्रष्टाचार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज नावाने लूट चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र लुटला जात आहे. गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहे, असा आरोप राऊत यांनी केला.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस