माघी गणेशोत्सवाची तयारी
By admin | Published: February 10, 2016 04:13 AM2016-02-10T04:13:50+5:302016-02-10T04:13:50+5:30
गेल्या काही वर्षांपासून गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेश जयंतीचे स्वरूप पालटले आहे. माघी गणेश जयंतीचे उत्सवही मोठ्या स्वरूपात साजरे होत असून यासाठीच मुंबईकरांची लगबग
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेश जयंतीचे स्वरूप पालटले आहे. माघी गणेश जयंतीचे उत्सवही मोठ्या स्वरूपात साजरे होत असून यासाठीच मुंबईकरांची लगबग सुरू आहे. माघी गणेश जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात असून शहर-उपनगरांतील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. शहर व उपनगरांतील प्रसिद्ध गणेश मंदिरांना रोषणाई करण्यात आली आहे.
नवी मंडळे या उत्सवात सहभागी होत आहेत. शिवाय, आगमन सोहळे, पाद्यपूजन आणि आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेल या उत्सवात दिसून येत आहे. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर येथे १४ फेब्रुवारीपर्यंत माघी गणेश जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडतील. त्यात गुरुवार, ११ फेब्रुवारी रोजी श्रींची रथशोभायात्रा सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत निघणार आहे. मंदिराशेजारील नर्दुल्ला टँक मैदानात भाविकांसाठी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० ते ३.३० या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन केले आहे, अशी माहिती सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे कळविण्यात आले आहे.
दादर येथील श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीतर्फे ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पूजेचे आयोजन करण्यात आले आहे, तर १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सहस्रावर्तन होईल. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मंत्रजागर होणार असून १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता गणेश याग पार पडेल. घाटकोपर येथील शिवप्रसाद गृहनिर्माण संस्थेच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)