तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू; तीन हजार फोल्डेबल खाटा घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 06:44 AM2021-05-02T06:44:51+5:302021-05-02T06:44:59+5:30
शंभर व्हेंटिलेटर; तीन हजार फोल्डेबल खाटा घेणार, १३ कोटींहून अधिक रकमेचा वापर
मुंबई : मुंबईकर सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत असताना आणखी तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही लाट ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता असल्याने महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यानुसार तीन हजार फोल्डेबल खाटा आणि शंभर व्हेंटिलेटरर्सची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका १३ कोटीहून अधिक रक्कम खर्च करणार आहे.
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोना या विषाणूने शिरकाव केला आहे. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याचे वाटत असताना फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसरी लाट धडकली. तर ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार आणखी वेगाने झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला. मार्च - एप्रिल महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या थेट ९० हजारांवर पोहोचली. यामुळे रुग्णालयात खाटांची कमतरता, अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटर खाटांचा तुटवडा व औषधांची कमतरता, अशा समस्या उभ्या राहिल्या.
पालिका उभारणार जम्बो फिल्ड रुग्णालय
nसंभाव्य दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेने जम्बो फिल्ड रुग्णालय उभारण्यावर भर दिला आहे. चार ठिकाणी प्रत्येकी एक हजार खाटांचे जम्बो कोविड केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. तर, रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्पही उभारण्यात येणार आहेत.
nतीन हजार खाटा खरेदी करण्यात येणार आहेत. या प्रत्येक खाटेसाठी सहा हजार ३७० रुपये, दोन हजार खाटा साईड लॉकर यासाठी प्रत्येकी चार हजार ७५० रुपये आणि तीन हजार आयव्ही स्टँड विकत घेण्यात येणार आहे. या आयव्ही स्टँडसाठी प्रत्येकी एक हजार १८ रुपये असे दोन कोटी ८६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
nकोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत व्हेंटिलेटरवर ताण आला होता.
व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे
आता १०० व्हेंटिलेटर खरेदी केले जाणार आहेत. या प्रत्येक व्हेंटिलेटरच्या देखभालीसाठी पालिका १७ लाख २७ हजार असे १० कोटी ५७ लाख
रुपये मोजणार आहे.