राज्यातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:10 AM2021-08-28T04:10:17+5:302021-08-28T04:10:17+5:30
राज्यातील हजारो शिक्षकांचा वरिष्ठ व निवडश्रेणीचा प्रश्न लवकरच सुटणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वरिष्ठ निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत ...
राज्यातील हजारो शिक्षकांचा वरिष्ठ व निवडश्रेणीचा प्रश्न लवकरच सुटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरिष्ठ निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन/ऑफलाइन अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय असे चार स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी उद्दिष्टे, विषयांची निश्चिती, घटकांची निश्चिती, वेळापत्रक तयार करणे, घटकांचे सादरीकरण करणे व त्याला अंतिम स्वरूप देण्याचे कामकाज सुरू आहे. काेरोना परिस्थितीत ऑनलाइन १० दिवसांच्या प्रशिक्षण आयोजनाची पूर्वतयारी परिषद स्तरावर सुरू करण्यात येत असल्याची माहिती एससीईआरटीकडून देण्यात आली आहे.
राज्यातील हजारो शिक्षकांना मागील काही वर्षांपासून वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र असूनही प्रशिक्षणअभावी वेतनश्रेणी मिळत नव्हती याविरोधात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी ५ सप्टेंबर रोजी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत बोरनारे यांनी १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठविले होते. दरम्यान, शुक्रवारी याबाबत बोरनारे यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम. डी. सिंह यांनी पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे, तसेच या पत्रात शासनाकडून प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती दिली असल्याचे बोरनारे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना १२ वर्षांनंतर वरिष्ठ व २४ वर्षानंतर निवडश्रेणी मिळते. सेवांतर्गत प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे आहे; परंतु सदर संस्थेने प्रशिक्षणच आयोजित न केल्याने शिक्षकांच्या सेवानिवृतीवर परिणाम होत असून, अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत, यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे प्रशिक्षण मिळाल्यावर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आंदोलनावर ठाम
दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील केवळ एक प्रश्न सुटत असला तरी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली असून, यामुळे राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक व पालक सर्वच भरडले जात असून, याविरोधात आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.