सर्व २८८ जागांची तयारी ठेवा; भाजपचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 07:43 AM2019-06-23T07:43:34+5:302019-06-23T07:44:43+5:30
भाजप-शिवसेना युतीच्या आणाभाका घेत असताना, भाजपने राज्याचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदारांना सर्व २८८ जागांवर विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आणि पूर्वतयारीचा कालबद्ध कार्यक्रमही दिला.
मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या आणाभाका घेत असताना, भाजपने राज्याचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदारांना सर्व २८८ जागांवर विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आणि पूर्वतयारीचा कालबद्ध कार्यक्रमही दिला.
युती होईल, पण त्यात मुख्यमंत्री कोणाचा हे समजूतदार माणसाला कळते. अननुभवी, बालिश लोकांना त्याची चर्चा करू द्या, जिंकण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी करीत युती झाली, तरी मुख्यमंत्रिपद भाजपकडे राहील, असे एका प्रकारे स्पष्ट केले.
राज्यात शिवसेनेशी युती होईल, पण कोणाला कोणत्या जागा सुटतील, हे ठरलेले नाही. तुम्ही मात्र, सर्व २८८ जागा लढण्याची तयारी ठेवा, असे उद्गार त्यांनी काढले. त्यामुळे भाजप स्वबळावर लढण्याच्या मूडमध्ये तर नाही ना, अशी चर्चा आमदार, पदाधिकाऱ्यांमध्ये होती. मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, या चर्चेत तुम्ही पडू नका, ते आम्ही बघू, असे मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभेला ७०-८० टक्के मते युतीला मिळाली, तेथील पक्षाच्या आमदारांनी गाफील न राहता परिश्रम घ्यावेत, असे ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष दानवे यांनीही २२० जागा जिंकण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आदींनीही मुख्यमंत्रिपद भाजपकडेच राहील, असे बैठकीत सांगितले. मुख्यमंत्रिपद भाजपकडेच असावे, अशी पक्षात भावना आहे, पण अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते घेतील, असे चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नंतर सांगितले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २५ जुलै ते १० आॅगस्टपर्यंत बुथ कार्यकर्त्यांची संमेलने घेतली जातील. १ जुलै ते १ आॅगस्ट दरम्यान नवमतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार असून, केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती घराघरात दिली जाणार आहे.
कोणी तोंड घालू नये; उद्धव यांचा टोला
भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि आमचे युतीबाबत ठरले आहे. इतर कोणी आता त्यात तोंड घालू नये, अशी खरमरीत प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर दिली. - वृत्त/६