स्पर्धा परीक्षांची अशी करा तयारी
By admin | Published: June 2, 2017 05:13 AM2017-06-02T05:13:17+5:302017-06-02T05:13:17+5:30
दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी, असा प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नेहमीच पडतो. जे विद्यार्थी
- डॉ. बबन जोगदंड, -
(लेखक हे ‘यशदा’ या संस्थेत संशोधन अधिकारी आहेत.)
नेमकी तयारी कशी करावी?
दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी, असा प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नेहमीच पडतो. जे विद्यार्थी दहावी, बारावीला आहेत त्यांनी उन्हाळ्याच्या सुटीत जर एम.पी.एस.सी. किंवा यू.पी.एस.सी.साठी घेण्यात येणाऱ्या फाउंडेशन कोर्सला प्रवेश घेतला तर त्यांना योग्य दिशा मिळू शकेल. यानंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत जे उमेदवार यशस्वी झाले आहेत, त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यशवंतांची मार्गदर्शनपर व्याख्याने, त्यांची विविध मासिके, वर्तमानपत्रे, अनियतकालिके यामधून प्रकाशित झालेल्या मुलाखती यांचा लाभ घ्यावा. यू.पी.एस.सी. परीक्षेसाठी ही परीक्षा नेमकी काय असते यावर ‘आयएएस प्लॅनर’ व एमपीएससीसाठी ‘एमपीएससी प्लॅनर’ ही दोन पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती वाचून काढावी. यामुळे या परीक्षा संदर्भातील आपल्या सर्व शंका-कुशंका दूर होतील.
स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन (जनरल नॉलेज) या विषयावर अधिकाधिक प्रश्न पूर्वपरीक्षेपासून मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत विचारले जातात. त्यामुळे सामान्य अध्ययन या घटकासाठी पाचवी ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके पुन्हा पुन्हा वाचली पाहिजेत. यामधून या विषयाची बरीच तयारी होऊ शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये वर्तमानपत्रे, मासिके यांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन केले पाहिजे. विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सराव केला पाहिजे. वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या बातम्या यांचे दररोज वहीत टिपण काढून ठेवले पाहिजे. स्पर्धा परीक्षेत क्रीडा या विषयावरही प्रश्न येत असतात, त्यामुळे वर्तमानपत्रातील क्रीडा घडामोडींशी संबंधित पान अवश्य वाचून त्याचीही टिपणे काढावीत. अलीकडे स्पर्धा परीक्षांची अनेक मासिके बाजारात उपलब्ध आहेत. ती खरेदी करून बारकाईने वाचली पाहिजेत. लोकराज्य, योजना, यशोदामंथन, कुरुक्षेत्र ही मासिके नित्यनियमाने वाचायला हवीत. वर्तमानपत्रे व मासिके वाचण्यासाठी दररोज किमान एक ते दीड तासाचा वेळ द्यावा. वर्तमानपत्रे ही सामान्य अध्ययनासाठी त्याचबरोबर निबंधासाठी व मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयांसाठी फार म्हत्त्वाची भूमिका बजावतात. साधारणत: वर्तमानपत्राचा या परीक्षांसाठी २० ते २५ टक्के वाटा आहे; म्हणूून लहानपणापासून मुलांना वर्तमानपत्रे वाचण्याबाबत प्रवृत्त केले पाहिजे. दूरचित्रवाहिन्या व आकाशवाणीवरील मराठी व इंग्रजी बातम्याही दररोज ऐकायला हव्यात. तसेच दूरचित्रवाहिन्यांच्या चर्चाही आवर्जून पाहाव्यात. या चर्चा शक्यतो चालू घडामोडींशी संबंधित असतात. यामुळे आपल्या सामान्य ज्ञानात भर पडते. आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत. सगळीकडे माहितीचा स्फोट झाला आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून आपणास हवी ती माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकते. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अनेक संकेतस्थळे व युट्यूबच्या माध्यमातून खूप सारी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक हाताळता येणे गरजेचे आहे. संगणकावर मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये अधिक माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली इंग्रजी भाषा समृद्ध केली पाहिजे. भविष्यातही मुलाखतीसाठी या भाषेचा उपयोग होऊ शकतो. वक्तृत्व व लेखनशैली सुधारावी. कुठल्याही परीक्षेसाठी लेखनशैली उत्तम असायला हवी.
स्पर्धा परीक्षेसाठी काही पेपर्स हे वर्णनात्मक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर असायला हवे. ते विकसित करता येऊ शकते. लेखन, मनन, वाचन, चिंतन आणि मेहनत या पंचसूत्रीतून प्रभावी लेखन कौशल्यही सुधारता येते. विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीपासून मुलाखतीच्या अनुषंगाने तयारी करायला हवी. त्यासाठी त्यांनी आपले संवाद कौशल्य सुधारायला पाहिजे. बरेच विद्यार्थी नीट संवाद करत नाहीत. विशेषत: विद्यार्थिनी या खूप लाजाळू असतात. त्यांनी संवाद क ौशल्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. महाविद्यालयात अनेकदा वक्तृत्व, वाद-विवाद स्पर्धांचे आयोजन केले जाते. संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी झाले पाहिजे. त्याचबरोबर पट्टीच्या वक्त्यांची भाषणे आवर्जून ऐकून त्याचे निरीक्षण करून आपणही त्यांचे अनुकरण कसे करू शकतो याबाबत प्रयत्न असायला हवेत.
अलीकडे या परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात असल्या तरी लेखन कौशल्याचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी लिखाणाची चांगली शैली विकसित करायला हवी. लेखनाचा उपयोग निबंध या विषयाच्या पेपरसाठी प्रामुख्याने होतो. कारण निबंध लेखन हे आपल्याला अधिक गुण मिळवून देण्यात मदत करते. लेखनाची तयारी करताना अनेक पुस्तकांचे, साहित्यांचे वाचन आवश्यक आहे.
खरेतर, यासाठी शालेय जीवनापासून अवांतर वाचन करायला हवे. निबंध लिहिताना साध्या, सरळ, सोप्या भाषेत निबंधाची शैली विकसित करता येऊ शकते. त्यासाठी काव्य, म्हणी व वाक्प्रचार, काही उदाहरणे आपणास माहीत असणे गरजेचे आहे. निबंध लिहिताना आपले हस्ताक्षर उत्तम असले तर त्याचा उपयोग अधिक गुणांसाठी होतो. सरावाने आपले लेखन कौशल्य बालपणापासून विकसित करता येऊ शकते. त्यासाठी सातत्याने लेखन, वाचन करायला हवे.
अशा प्रकारे दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेच्या अंगाने तयारी के ल्यास आपणास कमीतकमी वेळेत व कमी वयात यश मिळू शकते. यासाठी मात्र परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास, स्वप्न महत्त्वाची ठरतात.
व्यक्तिमत्त्व विकास
स्पर्धा परीक्षेत मुलाखत ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा घेण्यासाठी आयोजित केली जाते. त्यासाठी लहानपणापासून आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी, टापटिप, नीटनेटके असायला हवे. आपले बोलणे, चालणे, शब्दफेक, पोषाख या बाबींकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मुलाखतीच्या वेळी मुलाखतीच्या पॅनलमधील सदस्यांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल, यासाठी दहावी-बारावीपासून तयारी करायला हवी. प्रशासनामध्ये प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या अधिकाऱ्यांचा एक वेगळा रुबाब असतो. त्यामुळे आपली छबी भविष्यात रुबाबदार कशी असेल यावर काम करण्याची गरज आहे.
बारावीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, जिल्हा निवड मंडळे या परीक्षेमध्ये अगदी सहज यश मिळू शकते. अलीकडे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती होत आहे. या परीक्षा अन्य परीक्षेच्या तुलनेत वेगळ्या असतात. या परीक्षांचा विशिष्ट अभ्यासक्रम असतो. तो सहा महिने किंवा वर्षभर पूर्ण केला की निश्चित यश मिळू शकते. बँकांच्या परीक्षा पास होण्यासाठीही लवकर तयारी करणे उपयोगाचे ठरू शकते.
यशस्वितांचे मार्गदर्शन
स्पर्धा परीक्षेमध्ये जे उमेदवार यशस्वी झाले आहेत त्यांचे मार्गदर्शन खूप मौलिक ठरते. आपण अशा उमेदवारांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या यशाचे पैलू जाणून घ्यायला हवेत. अभ्यासाची पद्धती, अभ्यासाचा वेळ, त्यांच्या नोट्स, त्यांची मुलाखतीची तयारी याबाबत त्यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घ्यावी व आपण त्याच्या अनुभवाचे अनुकरण करायला हवे. यशस्वी झालेले उमेदवार आपल्याला प्रेरणा देत असतात. त्यामुळे अशा उमेदवारांना आवर्जून भेटायला हवे. त्याचबरोबर असे उमेदवार सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. अशा कार्यक्रमातही उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. अशा प्रकारे ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे हळूहळू, थोडा थोडा केलेला अभ्यास आपणास निश्चित उपयोगी ठरतोय; मात्र त्यासाठी सातत्य व संयम आवश्यक आहे.