पूर्वतयारी झाली, उद्या मतदानाला या; आज मतदान केंद्रांवर पथके होणार रवाना - जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 03:09 PM2024-05-19T15:09:34+5:302024-05-19T15:11:13+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत सोमवारी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी संपली. या लोकशाहीच्या उत्सवासाठी शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयांनी कंबर कसली आहे. ‘निवडणूकपूर्व सगळी तयारी झाली आहे, आता फक्त मतदारांनी सोमवारी मोठ्या संख्येने मतदानासाठी केंद्रांवर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा,’ असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी येथे केले. मतदानाची सर्व प्रक्रिया गोपनीय असल्याने त्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांनी केंद्रावर येताना मोबाइल आणू नये, असेही त्यांनी पुढे सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत सोमवारी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार उपस्थित होते.
मुंबई उपनगर जिल्ह्यात येणाऱ्या चार मतदारसंघांमध्ये एकूण ८७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपनगर जिल्ह्यात ७४ लाख ४८ हजार ३८३ मतदार आहेत. तर, एक हजार ८३ मतदार केंद्रांची ठिकाणे असून, तेथे सात हजार ३५३ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर रविवारी सर्व मतदान पथके मतदान यंत्रांसह रवाना होतील. एकूण मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी सावली तसेच पाणी, एअर कुलर, पंखे, व्हीलचेअरसह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
२४ हजार जणांचे टपाली मतदान
उपनगरात चारही मतदारसंघांत मतदानासाठी ४० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी २२ हजार ४४ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे, तर दोन हजार ५१३ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी घरातूनच मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदार चिठ्ठी घरोघरी
७४ लाख मतदारांपैकी ५४ लाख मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविली आहे. ही सर्व प्रक्रिया रविवारपर्यंत ९० टक्के पूर्ण होईल, असेही क्षीरसागर यांनी सांगितले. केवळ चिठ्ठीवर मतदान करता येणार नाही, असेही ते म्हणाले.
दिव्यांगांसाठी मोफत बस, रिक्षाची व्यवस्था
- मुंबई उपनगरांतील १६ हजार ११६ दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे, यासाठी मोफत रिक्षा, टॅक्सी तसेच बसची व्यवस्था करण्यात आली आहे. क्षीरसागर यांनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवून या वाहनसेवेचे उद्घाटन केले.
- दिव्यांगांसाठी मतदानाच्या दिवशी विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका निश्चित मार्गावर ६१३ ठिकाणी बेस्टमार्फत व्हीलचेअर प्रवेशयोग्य मोफत बस तसेच १,१०६ व्हीलचेअर मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
१,३१२ ब्रेल व्होटर्स स्लिप
निवडणूक आयोगाच्या ॲपवर १३ हजार ८८८ अंधांनी नोंदणी केली होती. त्यांच्यासाठी एक हजार ३१२ ब्रेल व्होटर्स स्लिप वितरित करण्यात आले आहेत.