अमोल पाटील, खालापूरएक्स्प्रेस-वे वृक्षतोड प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित दोषींना चांगलेच फैलावर घेतले असून खालापूर तहसीलदारांना कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या. तहसीलदारांनी राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी, डेल्टा फोर्स, वन विभागांची संयुक्त बैठक घेवून तपासाचा आढावा घेवून कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले खरे मात्र ज्या जागेवरील वृक्षतोड झाली होती अगदी त्याच ठिकाणी जाहिरातीच्या फलक उभारणीचे काम सुरू असल्याने संशयाची सुई उचलली जात आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाक्याजवळील धामणी गावाच्या हद्दीत पुण्याकडील लेनवर अलीकडे अनधिकृतरीत्या जाहिरातबाजी करणाऱ्यांकडून वृक्षतोड झाली होती. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या वृक्षांची बेसुमार कत्तल होत असताना रस्त्याच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या आयआरबी, डेल्टा फोर्स यांनी जाणीवपूर्वक का दुर्लक्ष केले तर वन विभागाने ठोस अशी काहीच कारवाई संबंधितांवर केली नसल्याने पर्यावरणप्रेमींनी दोषींवर कारवाईसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खालापूर तहसीलदार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामधील अधिकाऱ्यांची पर्यावरणप्रेमींनी भेट घेवून कारवाईकरिता निवेदन सादर केले, परंतु वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल न करता चौकशीचा फार्स सुरु ठेवल्याने पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे साकडे घातल्याने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश खालापूर तहसीलदारांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने खालापूर तहसीलदार दीपक आकडे यांनी एमएसआरडीसीसह आयआरबी, डेल्टा यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याबाबत अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी एमएसआरडीसीचे सहायक उपअभियंता ए.के. गुप्ता, आयआरबीचे अशोक परंदीवार, एस. जोशवा, एम.एच.गांधी आदी उपस्थित होते. वादग्रस्त जागेलगतच्या मोकळ्या जागेवर जाहिरातीचे फलक उभारणीचे काम सुरु झाल्याने पर्यावरणप्रेमींनी चौकशीसाठी आग्रह धरला आहे.
वृक्षतोडीनंतर तयारी जाहिरातबाजीची
By admin | Published: February 01, 2015 10:56 PM