Join us

पालिकेच्या शाळा क्वारंटाईन कक्ष होण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 5:34 PM

शिक्षकांना योग्य प्रशिक्षण  सुरक्षा साधने पुरविण्याची शिक्षकांची मागणी

 

मुंबई : मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा लक्षात घेता आता, महापालिकेच्या शाळा या विलगीकरण कक्ष म्हणजेच क्वॉरन्टाईन रुम म्हणून वापरण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाशी लढताना महापालिकेच्या शाळा विलगीकरण कक्ष म्हणून वापरता याव्यात यासाठी तयारी करण्याचे निवेदन पत्र मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व उपशिक्षण अधिकार, मुख्याध्यापक, शाळा निरीक्षक, सर्व अधीक्षक यांना दिले असून त्याप्रमाणे तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.यामध्ये सर्व क्षेत्रीय उपशिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखाली खाली येणाऱ्या पालिका  शाळा, पालिकेच्या प्राथमिक शाळा या क्वॉरन्टाईन सेंटर म्हणून द्याव्यात यासाठी शाळांची यादी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळा मोडकळीस आलेली नाही किंवा दुरुस्तीचे काम सुरु नाही याची खातरजमा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करुन घेण्यासाठी सांगण्यात आले आहे.विलगीकरण कक्षासाठी देण्यात येणाऱ्या शाळांमध्ये स्वच्छतागृहे, पंखे, पाणी इतर सोयीसुविधा नसतील तर तातडीने त्या दिल्या जाव्यात आणि या समस्या तातडीने सोडवला जाव्यात, असे या पत्रात नमूद करण्यात आले असून याशिवाय उपशिक्षण अधिकारी, अधीक्षक यांनी या शाळांमध्ये शाळा प्रतिनिधी ठेवण्यासाठी नियोजन कराव, जेणेकरुन प्रत्येक शाळेत हे शाळा प्रतिनिधी या ठिकाणी काम करतील. काही शिक्षक, मुख्याध्यापक गावी असल्याने त्यांच्या कामाबद्दलचे नियोजन करुन, त्यांना कामावर येण्यासाठी आवश्यकतेनुसार लेखी आदेश देण्यात यावे असे ही शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी पत्रात निर्देशित केले आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी या शाळा क्वॉरन्टाईन सेंटर म्हणून वापरात आणणे आणि प्रत्यक्षात या विलगीकरण कक्षात काम करण्याबाबतच्या सूचना अल्प कालावधीत जारी केल्या जातील. त्यासाठी पूर्व तयारी करण्यात यावी असे या पत्रात  नमूद करण्यात आले आहे. 

देशच कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली आहे अशा वेळी काम करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि शिक्षक ही भूमिका पार पाडतील. परंतु अशा वेळी योग्य ते प्रशिक्षण शिक्षकांना देणे आवश्यक आहे. खबरदारीचा उपाय वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितला पाहिजे. या कामासाठी शिक्षकांना आरोग्य सुरक्षा कवच आणि साधने उपलब्ध करुन दिली पाहिजे. पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ल्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. अशावेळी सरकारने योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या उपाययोजनांची अंमलबजावणी, त्यासोबतच येण्या जाण्यासाठीची सोय केली जावी- उदय नरे , शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल , अंधेरी  

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई