संतोष आंधळे
मुंबई : मंकीपॉक्स संसर्गाच्या फैलावाचा धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून विविध ठिकाणी संशयित रुग्णांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आय सी एम आर ) या आजारविरोधात लस बनविण्यासाठी भारतातील ज्या संस्थांना लस बनविण्याची इच्छा आहे अशा संस्थांना विचारणा करून ज्यांना रस असेल त्यांना अर्ज करण्यास सांगितले होते. यामध्ये काही खासगी लस उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांसोबत राज्यातील परळ येथील शासनाच्या हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेने लस बनविण्याची तयारी दाखविली आहे.
अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार, सध्या घडीला जगात ४१ हजार ३५८ रुग्ण सापडले असून या आजरामुळे आतापर्यंत १२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर भारतात सध्याच्या घडीला या आजाराचे आठ रुग्ण सापडले असून सगळे रुग्ण दिल्ली आणि केरळ येथील असून यामधील १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत या आजराचा एकही रुग्ण सापडलेला नाही.
या आजराच्या पार्शवभूमीवर राज्याच्या विविध भागातून संशयित रुग्णाचे नमुने घेण्यात आले होते आणि ते तपासणी करण्याकरिता पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्याकरीता पाठविण्यात आले असून सर्व रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहीती आरोग्य विभागाने दिली आहे.
हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेने मंकीपॉक्स आजरा विरोधात लस तयार करण्याची तयारी दाखविली असल्याच्या वृत्तास वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था देशातील सर्वात जुनी संस्था त्याची स्थापना १८९९ मध्ये करण्यात आली. या संस्थेमध्ये विविध रोगांवर लशी निर्माण करण्यात आल्या असून त्यासंदर्भात प्रशिक्षण आणि संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेकडे लस बनविण्याची क्षमता असून त्यासाठी लागणारी सर्व साधन सामुग्री येथे उपलब्ध आहे. आय सी एम आर ने लस बनविण्याची परवानगी दिली तर या संस्थेत या ठिकाणी सर्व प्रकारच्या लस उत्पादन पूर्वीच्या आणि लस तयार झाल्यानंतरच्या चाचण्या घेण्याची व्यवस्था आहे. जर या ठिकाणी लस तयार झाली तर त्याचे उत्पादन याच परिसरातील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळतर्फे करण्यात येईल.
मंकी पॉक्सचा आजार माकडांपासून मानवाला होतो. त्यानंतर तो माणसातून माणसात संक्रमित होत असतो. या आजरामध्ये ,डोळ्यांमध्ये वेदना होणे किंवा अंधुक दिसू लागणे, श्वास अपुरा पडणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, शुद्ध हरपणे किंवा अप्स्माराचे झटके येणे, लघवी होण्याचे प्रमाण कमी होणे या गोष्टी होतात. तर ताप, थकवा, डोके दुखणे किंवा स्नायू दुखणे, घसा खवखवणे किंवा खोकला येणे, कान मागे, गळ्या भोवती काखेत किंवा जांघेतील लसिका ग्रंथीना सूज येणे, त्वचेवर पुरळ, फोड (तोंडापासून सुरु होऊन हातपाय आणि तळाव्या पर्यंत) या अशा लक्षणांचा समावेश आहे.