मुंबईः माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, विनोद तावडे यांसह दिग्गज नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे रणजितसिंह मोहिते-पाटलांबरोबरच धैर्यशील मोहिते-पाटलांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी माळशिरस पंचायत समिती सभापतींसह अन्य पदाधिकारीही भाजपात डेरेदाखल झाले.सातारा, सोलापूर, अकलूज येथील राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांबरोबरच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सोलापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती किरण पवार, शिवतेज सिंह मोहिते-पाटील, अर्जुन सिंह मोहिते-पाटील यांच्यासह माळशिरस पंचायत समितीचे सर्व सदस्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. माळशिरसच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील आणि उपसभापती किशोर सूळ यांचाही भाजपा प्रवेश केला आहे. रणजितसिंह मोहिते-पाटलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. जवळपास 12 ते 14 वर्षांपासून मुख्यमंत्री आणि माझ्यात आपुलकीचं नातं आहे. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार असताना भाजपाने माढा मतदारसंघात अनेक रस्त्यांची कामे केली, भाजपावाले पक्ष बाजूला ठेवून काम करत असल्याचंही रणजितसिंह मोहिते-पाटलांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 1:57 PM