मुंबई : गुरुवारी सकाळी ८च्या नोंदीनुसार, बुधवारी रात्री मुंबईत तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. सांताक्रुझ, वांद्रे, महालक्ष्मी आणि राम मंदिर येथे बऱ्यापैकी पावसाची नोंद झाली असून, ठाणे आणि नवी मुंबईतही तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. १८ जुलैपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. गुरुवारी सकाळी कुलाबा आणि सांताक्रुझ या दोन्ही वेधशाळेत पावसाची बºयापैकी नोंद झाली आहे. या पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याकडील माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक येथील हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून लगतच्या परिसरात पाऊस कोसळत आहे. मुंबईत झालेला पाऊसही याचाच एक भाग आहे. पुढच्या काही तासांसाठी मुंबई आणि उपनगरात पाऊस अशाच रीतीने कोसळत राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
२५ आणि २६ जुलैच्या आसपास पावसाचे प्रमाण वाढेल. याच काळात मुंबईचे वातावरण आल्हाददायक होईल. बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास बोरीवली पश्चिम येथील आर्यभट्ट रोड येथील नाल्यात एक व्यक्ती पडली. त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. सिरोज नशीर शेख असे या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, मुंबईत सकाळी, दुपारी आणि सायंकाळी पावसाने विश्रांतीच घेतली. कुठे तरी पडलेली तुरळक सर वगळता मुंबई तशी कोरडीच होती. मात्र गुरुवारी दिवसभर मुंबईवर पावसाचे ढग दाटून आले होते. प्रत्यक्षात मात दिवसभर पाऊस बेपत्ताच होता.