Join us

पूर्ण नव्हे, हंगामी अर्थसंकल्प मांडा! अनिल परब यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 11:10 AM

Anil Parab : पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा घाट घातला जात आहे. त्यांनी तसे न करता हंगामी अर्थसंकल्प मांडावा, अशी मागणी आ. अनिल परब यांनी गुरुवारी केली.

मुंबई : मुंबई महापालिकेचे खरे मालक हे नगरसेवक आणि स्थायी समिती आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाचा अधिकारही त्यांच्याकडेच असताना पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा घाट घातला जात आहे. त्यांनी तसे न करता हंगामी अर्थसंकल्प मांडावा, अशी मागणी आ. अनिल परब यांनी गुरुवारी केली. पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा परब यांनी दिला.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पाला विरोध करण्यासंदर्भात परब यांनी ठाकरे गटाची भूमिका मांडली.  ओबीसींचे राजकीय आरक्षण, कोविड, पालिकेतील नगरसेवकांची संख्या, आदी कारणांमुळे राज्यातील विविध पालिकांच्या निवडणुका अधांतरी आहेत. 

पालिकांवर प्रशासक आहेत. प्रशासक हे पालिका तिजोरीचे मालक नसून, केवळ व्यवस्थापक आहेत. त्याचे खरे मालक नगरसेवक आणि स्थायी समिती असते. मात्र, सध्या आपणच मालक असल्याच्या  थाटात कंत्राटांचे खिरापत वाटण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप परब यांनी केला. 

अधिकारांचा गैरवापरमहापालिका आयुक्तांना अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार असला तरी हा गैरवापर ठरेल, असा दावा परब यांनी यावेळी केला. शिवाय, गैरवापर आणि चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्यासाठी नगरसेवकच नाहीत. त्यामुळे मनमानी कारभार थांबवत तीन-चार महिन्यांसाठी हंगामी अर्थसंकल्प मांडावा. पालिका निवडणुका झाल्यानंतर नव्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण अर्थसंकल्प मांडता येईल, असे अनिल परब म्हणाले.

टॅग्स :अनिल परब