Sharad Pawar: सध्या ED, CBI चा वापर राजकीय दृष्टीनं केला जातोय असं चित्र : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 02:31 PM2021-10-13T14:31:49+5:302021-10-13T14:32:36+5:30
ज्यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले ते अधिकारी कुठे आहेत याचाच पत्ता लागत नाही, पवार यांचं वक्तव्य.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारSharad Pawar यांनी तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ईडी, सीबीआय यांचा वापर राजकीय दृष्टीनं केला जात असल्याचं चित्र दिसत असल्याचं म्हटलं. तसंच याशिवाय त्यांनी परमबीर सिंग यांच्यावरही टीका करत अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंग हे गायब असून त्यांचा अजून पत्ता लागला नसल्याचं म्हटलं.
"काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्यानं केंद्र सरकारकडून टाकण्यात येत आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांसारख्या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीनं केला जात असल्याचं सध्या चित्र दिसत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्तांनी आरोप केले त्यातून देशमुख यांनी राजीनामा दिला होता. परंतु ज्यांनी ते आरोप केले ते अधिकारी कुठे आहेत याचा पत्ता लागत नाही. जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्यांबाबत असे आरोप करतो असं चित्रयापूर्वी कधीही घडलं नव्हतं," असं पवार यावेळी म्हणाले. अनिल देशमुख यांच्या घरी आता पाचव्यांदा छापा टाकण्यात आला असून पाच वेळा छापा हा सीबीआयचा विक्रम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
लखीमपूरसारखी घटना यापूर्वी घडली नाही
"लाखीमपूर खेरी याठिकाणी जो हिंसाचार झाला तो पूर्वी कधी झाला नव्हता. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा होता ही गोष्ट आधी नाकारली गेली. परंतु न्यायालयानं दखल घेतल्यानंतर त्याला अटक करावी लागली. यात सत्ताधारी पक्ष भाजपनं भूमिका घ्यायला हवी होती. शेतकऱ्यांची हत्या झाली आहे, त्या घटनेत एक पत्रकार सुद्दा मृत्यू पावले आहेत हे मला एका वृत्तपत्रातून समजलं आहे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
लखीमपूरच्या मुद्द्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मावळमध्ये काय घडलं असं विचारलं. त्यांनी जे काही विचारलं ते बरं केलं. मावळमध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडले. परंतु त्यांच्या मृत्यूला नेते जबाबदार नव्हते. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काही पाऊल उचललं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मावळमधल्या शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतरप लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी होती. तिच स्थिती आज लखीमपूरमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं.
बंद यशस्वी
"लखीमपूर घटनेनंतर राज्यातील तीन प्रमुख राजकीय पक्षांनी बंदचा निर्णय घेतला. यामध्ये शिवसेनेसह अन्य पक्ष सहभागी असताना तो बंद यशस्वी झाला. यासाठी जनतेला आणि तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला हवे. लखीमपूर येथील घटनेची नोंद सामान्य माणूसही घेत असल्याचं यातून दिसून आलं," असं पवार म्हणाले.