सध्या मंदिरांपेक्षा आरोग्य मंदिरे महत्त्वाची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:09 AM2021-09-08T08:09:16+5:302021-09-08T08:09:56+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; भारतमातेचा जयघोष करणाऱ्या भाजप आमदाराला प्रत्युत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर आग्रही असलेल्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्य मंदिरांची उभारणी जास्त गरजेची आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या विविध विकासकामांचे ऑनलाइन लोकार्पण करताना व्यक्त केले.
ऑनलाइन लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार रवींद्र फाटक, विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी मान्यवरांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आमदार चव्हाण यांनी मंदिरे उघडण्याचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कायदा हातात घेणाऱ्यांना दया माया नको
स्कायवॉक फेरीवालामुक्त होणे, हा महत्त्वाचा विषय आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महिला सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे. त्यात महिला पोलिसही आल्या. जो कोणी कायदा हातात घेत असेल त्यांना दया माया दाखवून चालणार नाही. फेरीवाल्यांच्या उच्छाद आटोक्यात आणण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल, असे ते म्हणाले.
फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका
आमदार चव्हाण यांनी कल्याण - डोंबिवलीच्या विकासाचा अनुशेषाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण- डोंबिवलीच्या विकासासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. मग हा अनुशेष कशामुळे राहिला असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.