सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरु होणार?; महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 03:40 PM2021-06-01T15:40:04+5:302021-06-01T15:44:25+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे
मुंबई: राज्यात मे महिन्याच्या अखेरीस दैनंदिन रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झालेली दिसून आली. राज्यात दिवसभरात १५ हजार ७७ रुग्ण आणि १८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सोमवारी ३३ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ५३ लाख ९५ हजार ३७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २ लाख ५३ हजार ३६७ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८८ टक्के असून, मृत्यूदर १.६६ टक्के आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत मुंबईतील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकानं सुरू ठेवण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तर शनिवार, रविवार हे दोन दिवस सर्व दुकानं बंद राहणार आहेत. मात्र, या सगळ्यापेक्षा मुंबईकरांच्यादृष्टीने महत्वाची असलेली लोकल सेवा सर्वांसाठी कधी पासून सुरु, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकल सेवेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबईत लोकल ट्रेन नेमक्या कधी सुरू होणार याचं उत्तर महापालिका देऊ शकत नाही. राज्य सरकार त्याचं उत्तर देईल आणि त्यावर निश्चितच विचार केला जात असेल, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. लोकल सुरू झाली की त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. मागील वेळीही तसं झालं होतं. मोठ्या संख्येनं लोक विनामास्क ये-जा करत होते. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यावर झाला होता. त्यामुळं लोकल ट्रेनसाठी आपल्याला आणखी काही दिवस थांबावं लागेल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मुंबईत बाधित रुग्णांची संख्या दररोज नऊ ते दहा हजारांवर पोहोचली होती. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी २३ एप्रिलपासून संपूर्ण राज्यासह मुंबईत लॉक डाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र कोविडचा पॉझिटीव्हीटी दर दहापेक्षा कमी असलेल्या महापालिकांच्या हद्दीत शिथीलता आणण्याचे अधिकार संबंधित पालिकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेने १ जूनपासून सुधारित नियमावली जाहीर केली आहे. आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ही वेळ वाढवून दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे.
मुंबईत दिवसभरात आढळले सहाशे रुग्ण-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून मुंबई बरी होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत मे महिन्याच्या अखेरीस सोमवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात ६७६ रुग्णांचे निदान झाले असून, २९ मृत्यूंची नाेंद झाली. दुसरीकडे पाच हजार ५७० रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण सहा लाख ६६ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
सध्या २२ हजार ३९० रुग्ण उपचाराधीन आहेत. यात १९ हजार ९० लक्षणविरहित आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के आहे, तर रुग्ण दुपटीच्या कालावधीने चारशेचा टप्पा ओलांडला असून तो ४३३ दिवसांवर पोहोचला आहे. २४ ते ३० मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१५ टक्के आहे. मुंबईत सोमवारी दिवसभरात १७ हजार ८६५, तर आतापर्यंत एकूण ६२ लाख ७१ हजार ७४३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.