मुंबई: मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी येत्या सात दिवसांत प्रकल्पाचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाबाबत सभापती महोदयांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी सदरहू निर्देश दिले.चव्हाण म्हणाले, की सदरहू प्रकल्प मार्गी लागावा याकरिता प्रकल्प नियोजन सल्लागाराची (PMC) नियुक्ती करण्यासाठी येत्या ७ दिवसांत बैठक घेण्यात यावी. त्यासाठी येत्या आठवडाभरात नियोजनबद्ध आराखडा सादर करावा तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरविण्याच्या सूचना चव्हाण यांनी केल्या. म्हाडाने मोतीलाल नगर १, २ व ३ च्या पुनर्विकासाची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही चव्हाण यांनी दिले. चव्हाण म्हणाले, की गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर १, २ व ३ हे सुमारे १४२.८९ एकर जमिनीवर वसलेले आहे. या वसाहतीत मुंबई मंडळाने झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत सन १९६०च्या दरम्यान ३७०० गाळे बांधलेले आहेत. प्राधिकरणाचा २४ ऑक्टोबर २०१३ रोजीच्या ठराव क्रमांक ६६४० नुसार उपरोक्त वसाहतीचा म्हाडामार्फत पुनर्विकास करावयाचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. प्राधिकरणाचा २९ मार्च २०१७ रोजीच्या ठराव क्रमांक ६७३२ अन्वये प्रकल्प नियोजन सल्लागार (PMC) नेमण्याबाबतची या आधी राबविलेली ई निविदा प्रक्रिया रद्द करून प्रकल्प नियोजन सल्लागार नेमण्याकरिता फेर निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर नव्याने ई निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी प्रारूप निविदा तयार करून प्रारूप निविदा मंजुरीच्या कामाला गती देण्याची सूचना चव्हाण यांनी केली. या पुनर्विकास प्रकल्पामुळे येथील ३७०० गाळेधारकांचे पुनर्वसन होऊन म्हाडाला मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होऊ शकेल, असेही चव्हाण यांनी सांगितले.यावेळी बैठकीला उपस्थित मोतीलाल नगर विकास समितीचे अध्यक्ष युवराज मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने मोतीलाल नगरचा पुनर्विकास म्हाडानेच करावा व या पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सभापती महोदयांकडे केली. यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मोतीलालनगर पुनर्विकासाबाबत सात दिवसांत कार्यक्रम सादर करा- मधू चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 7:18 PM