मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील २0 स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा विकास करताना स्थानके बहुमजली केली जाणार असून, यासाठी एमआरव्हीसीकडून प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. एकूण २ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या स्थानकांमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, लोअर परेल, दादर, अंधेरी, गोरेगाव, बोरीवली, मीरा रोड, भार्इंदर, विरार तसेच मध्य रेल्वेवरील दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, शहाड तर हार्बरवरील चेंबूर, वडाळा स्थानकांचा समावेश आहे. मुंबईतील २0 रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; आणि मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात त्याचे सादरीकरण एमआरव्हीसीकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेसमोर केले होते. यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर हा प्रस्ताव आता रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. यात स्थानकातील कार्यालये पहिल्या मजल्यावर शिफ्ट केली जाणार असून, रेल्वे, मेट्रो आणि बेस्टच्या प्रवाशांची विनाअडथळा एकमेकांशी आदानप्रदान होण्यास मदत होणार आहे. एमआरव्हीसीने एमयूटीपी-३चा एक भाग म्हणून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
२0 रेल्वे स्थानके बहुमजली करण्यासाठी प्रस्ताव सादर
By admin | Published: October 14, 2015 3:54 AM