मुंबई - मुंबई महापालिकेचा सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षासाठीचा ५९,९५४.७५ हजार कोटी रुपये आकारमान असलेला, मुंबईकरांना अधिकाधिक सेवासुविधा, नवीन प्रकल्प, योजना, विकासकामे देणारा आणि ५८.२२ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आज सकाळी ११.०८ वाजता मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांना सादर करण्यात आला.
आगामी निवडणुका लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पावर राज्यातील सत्ताधारी शिवसेना (मुख्यमंत्री शिंदे गट) आणि केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजप सरकार यांची छाप दिसून येत आहे. मुंबईकर मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी विविध योजना, विकासकामे, प्रकल्प आणि सोयीसुविधा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यासाठी हजारो कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दुपारी ११ वाजता अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प तर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे महापालिकेचा संपूर्ण अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल यांना सादर केला. यावेळी, अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, सुधाकर शिंदे, अश्विनी भिडे आणि अश्विनी जोशी चार अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त, विविध खाते प्रमुख उपस्थित होते.
महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार मे २०२० पासून सांभाळणारे इकबाल चहल यांच्या कार्यकाळात चौथ्यांदा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होत आहे. फरक एवढाच आहे की, मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ पासून संपुष्टात आल्याने तेव्हापासून इकबाल चहल हे 'प्रशासक ' म्हणून मुंबई महापालिकेचा कारभार पाहत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात ७ हजार ३३५ कोटी ६८ लाख रुपयांनी वाढ सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प ५९ हजार ९५४ हजार कोटी ७५ लाख रुपये आकारमान आहे, तर ५८.२२ कोटी शिलकीचा आहे. गतवर्षी ५२ हजार ६१९ कोटी ७ लाख रुपये आकारमान आणि ६५.३३ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात ७ हजार ३३५ कोटी ६८ लाख रुपयांनी वाढ झाली आहे