Join us

शिवकालीन घराण्यांच्या ऐतिहासिक वास्तू आणि शस्त्रांचे संवर्धन; शासनाकडून समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 8:53 AM

या ऐतिहासिक ठेव्यांचा एकत्रित संग्रह करून त्यांचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवकालीन घराण्यांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे आणि दस्ताऐवज यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, यामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात योगदान देणाऱ्या मावळ्यांच्या वंशजांचा समावेश केला आहे. या ऐतिहासिक ठेव्यांचा एकत्रित संग्रह करून त्यांचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे.

ही समिती शिवकालीन वास्तू, शस्त्रे आणि दस्तऐवज यांचा शोध घेणार आहे. या घराण्यांसंबंधी ऐतिहासिक वास्तू, मौल्यवान पुरावस्तू, पुरावशेष यांची यादी आणि दस्तावेजीकरण करण्यासाठी मार्गदर्शन, संबंधित समकालीन दस्तावेजांचे, कागदपत्रांचे डिजिटायझेशन आणि जतन-संवर्धनासाठी साहाय्य, वास्तूंचे सार्वजनिक खासगी पद्धतीने जतन-संवर्धन कार्याचा आणि पर्यटनवृद्धीचा आराखडा तयार करणे, सरदार घराण्यांसंबंधी ऐतिहासिक वास्तू आणि कागदपत्रांचे संग्रहालय म्हणून एकत्रित विकास करण्यासाठी सहकार्य करणे अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.

समितीमध्ये सरदार कान्होजी राजे जेधे-देशमुख यांचे वारसदार इंद्रजीत जेधे, सरदार रायाजी बांदल-देशमुख यांचे वारसदार अनिकेत बांदल, सरदार हिरोजी इंदलकर यांचे वारसदार श्रीनिवास इंदलकर, सरलष्कर सिदोजी नाईक-निंबाळकर यांचे वारसदार ऋषिकेश राजेंद्रसिंह नाईक-निंबाळकर, पंत अमात्य बावडेकर यांचे वारसदार नीलकंठ बावडेकर, सरदार येसाजी कंक यांचे वारसदार रवींद्र कंक, सरदार शिरोळे यांचे वारसदार अभयराज शिरोळे, सरदार पिलाजी सणस यांचे वारसदार बाळासाहेब तथा रामदास सणस, सरदार जयताजी करंजावणे यांचे वारसदार गोरख करंजावणे, बकाजी आणि कोंडाजी फर्जंद यांचे वारसदार सचिन भोसले यांचा समावेश आहे. यासह श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे सचिव समीर वारेकर आणि कार्याध्यक्ष पांडुरंग ताठेले हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज