मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलं. तर, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आमदार अजित पवार यांना टोला मारला. तसेच, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष येतील, असे वाटत नाही.
पक्ष फोडणं ही शिवसेनेची भूमिका नाही. मला फोडलेली माणसं नको आहेत. मनानं जिंकलेली माणसं हवी आहेत. शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक सर्व सोबत आहेत. शिवसेनेची नव्हे, तर मराठी माणूस आणि हिंदूंची ताकद वाढते आहे. मराठी माणूस आणि हिंदूंकडे कोणीही वेड्या वाकड्या नजरेनं पाहणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, मी ‘घडाळ्याचे दोन्ही काटे तसेच ठेवलेत मी फक्त चावी मारण्याचे काम करतो. हे आले असले तरी त्यांचे पक्षाध्यक्ष येतील असे वाटत नाही,' असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मारला.
सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना वाढवण्याचं काम मी करणार आहे. मला असंख्य कार्यकर्त्यांचा फोन येत आहे, असे सचिन अहेर यांनी शिवसेनेत प्रवेस केल्यानंतर म्हटले आहे.