"अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही; हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक"
By मुकेश चव्हाण | Published: February 8, 2021 06:17 PM2021-02-08T18:17:11+5:302021-02-08T18:17:41+5:30
रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई/ सातारा : मास्टरब्लास्टर भारतरत्न आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यानं काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्स चांगलेच खवळले. सचिनच्या या ट्वीटने अनेकांच्याच भुवया उंचावल्या. काहींनी त्याला थेट धारेवर धरलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील इतर क्षेत्रांबद्दल व्यक्त होताना काळजी घ्यावी, असा सल्ला सचिनला दिला होता. शरद पवारांच्या या सल्ल्यावरुन आता रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. शरद पवार यांनी कधी लंगोट घालून कुस्ती खेळल्याचं मी तरी ऐकलं किंवा पाहिलं नाही. ते कधी हिंद केसरी झाले होते का, ही माहिती मी जुन्या लोकांकडून घेतली, तर त्यांनीही नाही म्हणून सांगितले. लहानपणी नारळावरच्या कुस्त्या खेळले असतील ते सोडा. पण तरीही ते कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले ना, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक आहे, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. पॉपस्टार रिहाना हिच्यावरही खोत यांनी टीका केली. भारतातल्या शेतकऱ्यांचा तिला मोठा कळवळा आला. ती ज्या खंडात राहते, तिथंही अनेक लोक राहतात, त्याविषयी तिनं कधी ट्वीट केलेलं पाहिलं नसल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
तत्पूर्वी, आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल, असं शरद पवारांनी सांगितलं. तसेच इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, असं शरद पवारांनी सांगितलं होतं.
भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता-
आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटींच्या ट्वीटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचे कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली होती.
यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, ही बाब गंभीर आहे. त्याचा तपास झाला पाहिजे. याबाबतची जबाबदारी गुप्तचर खात्याला दिली आहे. तसंच, सर्व सेलिब्रिटींचे ट्वीट एकसारखे कसे काय असू शकतात. त्यांच्यावर कुठला दबाव होता का? असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता आहे.
सचिन तेंडुलकरचं ट्विट
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना ( Rihanna) हिनं शेतकरी आंदोलनाबाबद ट्विट केल्यानंतर तिला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागला. सचिननं केलेलं ट्विट हे रिहानाला अप्रत्यक्ष सुनावणारे होते. ''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,''असं ट्विट सचिननं केलं होतं.
समीर विध्वंस यांची टीका
"सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो. तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता. आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचे पण वाईट जास्त वाटतंय!" असं ट्विट दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी केलं आहे.