मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अध्यक्ष, सचिव करणार जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 02:22 AM2019-10-06T02:22:54+5:302019-10-06T02:23:20+5:30
महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम ७९ अन्वये सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांना केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित करण्यात आले होते.
- खलील गिरकर
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांच्या माध्यमातून जास्तीतजास्त मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुमारे ३० हजार सोसायट्यांच्या माध्यमातून यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अॅण्ड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप)च्या माध्यमातून यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम ७९ अन्वये सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांना केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित करण्यात आले होते़ त्यांच्याद्वारे सोसायटीमधील पात्र नागरिकांना मतदार नोंदणीसाठी प्रेरित करणे व आताच्या टप्प्यावर मतदार असलेल्यांना मतदानासाठी प्रेरित करणे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अध्यक्ष व सचिवांचे सक्रिय सहकार्य घेऊन मतदानाचा टक्का वाढविणे हे याचे ध्येय आहे. विशेष म्हणजे यामध्ये काम करणाऱ्या सोसायटीच्या वार्षिक लेखा अहवालामध्ये या कामाची नोंद करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना (डीडीआर) यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. या कामामध्ये अध्यक्ष व सचिवांचे चांगले सहकार्य मिळत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (स्वीप) सोनाली मुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
उपनगरातील एकूण मतदारांपैकी सुमारे ४० टक्के मतदार सोसायट्यांमध्ये राहतात तर सुमारे ६० टक्के मतदार चाळी व झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, असा ढोबळ अंदाज आहे.
सोसायट्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये २० हजार पोस्टर्स छापण्यात आले आहेत़ सोसायटीच्या परिसरात, भिंतीवर ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. याशिवाय, झोपडपट्टीमधील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी १२ बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, कम्युनिटी हेल्थ स्वयंसेवक, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या स्वाक्षरीचे आवाहन पत्र सोसायट्यांना देण्यात आले आहे. त्याशिवाय आॅडिओ क्लिपद्वारे मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानातील कार्यकर्ते या सर्वांना यामध्ये सामील करून घेण्यात येत आहे.
व्होटर स्लिप वाटप वेळेवर होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक, महापालिकेचे उपनगरातील १५ प्रभाग अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन प्रभाग अधिकाऱ्यांकडे स्वतंत्र यंत्रणा असल्याने त्याचा व्होटर स्लिपवाटपामध्ये चांगला लाभ होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.