अध्यक्ष कुणाचा; कणकवली की मालवणचा?
By admin | Published: March 18, 2017 08:58 PM2017-03-18T20:58:19+5:302017-03-18T20:58:19+5:30
दावेदार संजना सावंत की सरोज परब ?
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक गत महिन्यात पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसने नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली २७ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले. हे बहुमत जरी काठावरचे असले तरी राज्यात विरोधी पक्षाची सर्वत्र पीछेहाट होत असताना सिंधुदुर्गात राज्यातील विरोधी पक्षाने मिळविलेला विजय खूप काही सांगून गेला. नारायण राणे यांचा राज्याच्या राजकारणात असलेला दबदबा कायम ठेवण्यासाठी त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरील काँग्रेसची सत्ता एकहाती मिळविणे हे आव्हान होते. मात्र, ते आव्हान त्यांनी लीलया पेलून सत्तेच्या राजकारणात त्यांच्या सर्व विरोधकांना मागे टाकण्यात पुन्हा यश मिळविले. जर शिवसेना आणि भाजपची येथे युती झाली असती तर सत्तेची गणिते उलटी दिसली असती असे आता म्हणणे उचित ठरणार नाही. कारण राजकारणात जर आणि तरच्या गणितांना वाव नसतो. आज आपण कोठे आहोत आणि आपल्यासमोरचे 'लक्ष्य' काय आहे, हे जाणून जर राज्यकर्त्यांनी राजकारण केले, तर ते यशस्वी होते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणून काँग्रेसच्या विजयाकडे पाहिले जाते. निवडणूक निकालानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून मंगळवारी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीत अध्यक्षपदाचा मान मालवणला मिळणार की कणकवलीला याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद हे पहिल्या अडीच वर्षांसाठी महिलांसाठी राखीव आहे. कणकवली तालुक्यातील नाटळ मतदारसंघातून निवडून आलेल्या व यापूर्वी महिला बालकल्याण समिती सभापती म्हणून काम केलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या पत्नी संजना सावंत यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवून काँग्रेसकडून नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कणकवली तालुक्यात काँग्रेसला मिळालेले यश हे १00 टक्के आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची पहिली संधी यावेळी संजना सावंत यांनाच दिली जाईल, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तर दुसरीकडे कणकवली पाठोपाठ मालवण तालुक्यानेही काँग्रेसला मोठी ताकद दिली आहे. मालवण तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ६ पैकी ५ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तसेच पंचायत समितीमध्येही १२ पैकी ९ जागा जिंंकून एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे मालवण तालुक्यातील मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी बजावणाऱ्या सरोज परब यांनाही अध्यक्षपदाच्या अनुभवी म्हणून संधी मिळू शकते. त्यामुळे संजना सावंत की सरोज परब या दोघांपैकी कोणाला पहिली संधी द्यायची याबाबत काँग्रेस नेते नारायण राणे स्वत: निर्णय घेणार असल्यामुळे याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळविण्याची नारायण राणे यांची ही चौथी टर्म होती. यापूर्वी सलग दोन वेळा काँग्रेसकडून, तर त्यापूर्वी शिवसेनेत असताना शिवसेनेकडून सत्ता मिळवत राणे तेथे सत्ता हे समीकरण कायम ठेवले आहे. नारायण राणे या सहा अक्षरांमध्ये असलेली ही जादू आहे. कारण दुसऱ्या कोणत्याही नेत्याला ते शक्य झालेले नाही. जिल्हा परिषद निवडणुकीतील राज्याचा अभ्यास करता २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात दोन टप्प्यात पार पडल्या. सिंधुदुर्ग वगळता कोणत्याही जिल्हा परिषदेत काँग्रेसला एवढे जबरदस्त यश मिळालेले नाही. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या सर्वच भागात सर्वच पक्षांनी कमी-अधिक प्रमाणात यश प्राप्त केले आहे. मात्र, त्या-त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाला या ना त्या पक्षाची मोट बांधून आता जिल्हा परिषदेतील सत्ता मिळवावी लागणार आहे. मात्र, सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा परिषद आहे की त्याठिकाणी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. राज्यातील २५ पैकी केवळ ६ जिल्हा परिषदांमध्ये एका पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यात लातूर, वर्धा, चंद्रपूर या तीन ठिकाणी भाजपने, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी, रत्नागिरीत शिवसेना व सिंधुदुर्गात काँग्रेसचा क्रमांक लागतो.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसला मिळालेले स्पष्ट बहुमत हे नारायण राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा विजय आहे. सन २0१४ साली लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांचा शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत यांनी दारुण पराभव केला आणि त्यानंतर चार महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत खुद्द नारायण राणे यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता नारायण राणेंचे पर्व संपले असल्याचे वातावरण विरोधकांकडून निर्माण केले जात होते. त्यातच विधानसभेच्या मुंबईतील वांद्रे मतदारसंघात पोटनिवडणुकीतही नारायण राणे यांना हार पत्करावी लागली होती. त्यामुळे गेल्या २५ वर्षांच्या सिंधुदुर्गातील राजकारणात हार हा शब्दच माहीत नसलेल्या राणेंचे राजकीय भवितव्य काय असणार याबाबत सर्वांनाच मोठी ुउत्सुकता होती. मात्र, राणे हे असे व्यक्तिमत्त्व आहेत की, ते यशासाठी सतत धडपडत राहते. आपण कुठे चुकलो? कुठे कमी पडलो? याचा ते दूरदृष्टी ठेवून अभ्यास करून नवीन उभारी घेतल्याशिवाय गप्प बसणाऱ्यातले नाहीत आणि नेमके तसेच झाले. राणे यांना काँग्रेसने विधानपरिषदेत आमदार म्हणून पुन्हा एकदा संधी दिल्याने आता पुन्हा राणे यांच्या तिसऱ्या राजकीय इनिंगला सुरुवात झाली. त्यानंतर सिंधुदुर्गमधील संघटनेत आवश्यक ते फेरबदल करून त्यांनी तेव्हापासूनच कार्यकर्त्यांना एकत्रित करून आक्रमकपणे सरकारविरोधी आवाज उठवायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून त्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या वैभववाडी, कुडाळ या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा सत्ता मिळविली. काठावरचे बहुमत असे ना का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नव्या उमेदीसाठी विजय हा शब्द बरेच काही सांगून गेला. त्यामुळे राणेंच्या विजयाचा वारू पुन्हा चौफेर उधळला व आपला संक्रमण काळ संपला म्हणून अनेक कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले. त्यातच जिल्हाध्यक्ष म्हणून राणेंचे निकटवर्तीय सहकारी आणि विश्वासू कार्यकर्ते दत्ता सामंत यांच्याकडे जबाबदारी आली. त्या जबाबदारीतून सामंत यांनी अगदी पक्षातील तळागाळाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्ष संघटना मजबुतीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले.
सावंतवाडी मतदारसंघातील दीपक केसरकर यांच्या असलेल्या एककलमी अंमलाला सुरूंग लावण्याचे कामही याच दरम्यान नारायण राणेंच्या साथीने सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी सुरू केले होते. त्यातच तीन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ले या दोन महत्त्वाच्या पालिकांमध्ये काँग्रेस नंबर वनचा पक्ष बनला. येथे दीपक केसरकरांच्या शिवसेनेला सपाटून मार खावा लागला. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसमधील त्या विजयाचे परिणाम दिसून आले.
सावंतवाडीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत ९ पैकी ५ जागा काँग्रेसने जिंकल्या, तर पंचायत समितीत १८ पैकी तब्बल ११ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली. वेंगुर्लेमध्येही जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ३ जागा जिंकून काँग्रेसने आपणच नंबर वन असल्याचे सिद्ध केले. काँग्रेसला दोडामार्ग तालुक्यात असे यश मिळविणे शक्य झाले नाही. कारण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये दोडामार्गमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. गतवेळी दोडामार्गमध्ये काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नव्हता. परिणामी राष्ट्रवादीमधून त्यावेळी निवडून आलेल्या अंकुश जाधव आणि शिवसेनेमधून निवडून आलेले प्रेमानंद नाडकर्णी यांना काँग्रेसमध्ये घेण्यात आले होते. हा मागील निवडणुकीचा इतिहास आता या निवडणुकीतही पहायला मिळाला.
यावेळीदेखील दोडामार्गात काँग्रेसला एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणता आला नाही, तर पंचायत समितीत सहापैकी केवळ एकच जागा मिळाली. त्यामुळे काँग्रेसला आवश्यक असणारे संख्याबळ गाठण्यासाठी दोडामार्ग तालुका बॅकफुटवर नेणारा ठरला. दोडामार्ग हा जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे की त्याठिकाणी मागील दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेला नाही. मागील म्हणजे सन २0१२ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्याचे राजकारण दोन भागात वळलेले दिसत होते. त्यात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले आणि कुडाळ या ठिकाणी केसरकर यांचा प्रभाव होता, तर कणकवली, देवगड, वैभववाडी आणि मालवण या ठिकाणी नारायण राणेंचा प्रभाव होता.
गतमहिन्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला टिकून राहिला. मात्र, त्यात युतीने म्हणजे शिवसेना आणि भाजपने शिरकाव केला. म्हणजे कणकवली, वैभववाडी, मालवण आणि देवगड तालुक्यांचा विचार करता मालवण आणि कणकवली वगळता देवगड आणि वैभववाडीत शत-प्रतिशत असलेली काँग्रेस मागे पडली. दोन्ही पंचायत समित्यांची सत्ता भाजप आणि शिवसेनेकडे गेली, तर जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येमध्येही घट झाली. देवगडमध्ये भाजप, शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या ७ जागांपैकी ५ ठिकाणी, तर वैभववाडीत ३ पैकी २ ठिकाणी विजय मिळविले.
तर दुसरीकडे दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात केसरकर यांना धक्का देत वेंगुर्ले आणि सावंतवाडीत काँग्रेसने शिरकाव केला. त्यामुळे आताच्या घडीला जिल्ह्यातील दोन्ही भागातील राजकारण हे संमिश्र पद्धतीने सुरू आहे. त्याचे परिणाम आगामी काळात आपल्याला पहावयाला मिळतील.