राज्यात हुक्कापार्लर बंदीला राष्ट्रपतींची संमती; अधिसूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 01:28 AM2018-10-08T01:28:04+5:302018-10-08T01:28:25+5:30
महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी संमतीची मोहर उमटवल्याने राज्याच्या गृहविभागाने तातडीने तशी अधिसूचना जारी केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी संमतीची मोहर उमटवल्याने राज्याच्या गृहविभागाने तातडीने तशी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे राज्यात हुक्का पार्लरवर बंदी लागू झाली आहे. सिगरेट आणि तंबाखू उत्पादनासंबंधी अधिनियम २००३ कायद्यान्वये ही
बंदी लागू झाली असून त्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
लोअर परळच्या कमला मिलमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये हुक्का पार्लरमुळे आग लागून १४ लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नागपूर अधिवेशनात हुक्का पार्लर बंदीचे अशासकीय विधेयक मांडले होते. एप्रिलमध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हुक्का पार्लरवरील बंदीच्या विधेयकाचा प्रस्ताव संमत करण्यात आला अणि ते मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले होते. सप्टेंबर अखेरीस राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर गुरूवारी गृहविभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली.
हुक्का पार्लरवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. याआधी गुजरातने अशी बंदी घातली आहे. या कायद्यामुळे पोलिसांना हुक्का पार्लरविरोधात धडक मोहीम उघडता येईल. हुक्का पार्लरबाबत नियमांतील संभ्रमामुळे यापूर्वी पोलिसी कारवाईत अडथळे येत असत. आता तो दूर होईल, असे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. २०१० साली मुंबई महापालिकेने रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये सिगारेट, विडी, हुक्कावर बंदी घातली होती. मात्र, २०१४ सर्वोच्च न्यायालयाने या बंदीविरोधात निर्णय दिला. तेव्हापासून हुक्का पार्लरवरील बंदी अथवा नियंत्रणाबाबत कायदेशीर तरतुदीची मागणी करण्यात येत होती. अखेर कमला मिल दुर्घटनेनंतर केलेल्या कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्याने हुक्काबंदी लागू झाली आहे.