राज्य तुरुंग सेवेतील तिघांना राष्ट्रपती पदके
By admin | Published: January 26, 2017 04:36 AM2017-01-26T04:36:42+5:302017-01-26T04:36:42+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील २७ तुरुंग कर्मचाऱ्यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदके बुधवारी जाहीर झाली. त्यांत तीन
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील २७ तुरुंग कर्मचाऱ्यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदके बुधवारी जाहीर झाली. त्यांत तीन मानकरी महाराष्ट्रातील आहेत. येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हवालदार रमेश रघुनाथ शिंदे व शिपाई सुभाष ज्ञानोबा कुऱ्हाडे आणि कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील हवालदार शिवाजी बाबुराव पाटील यांचा त्यांत समावेश आहे.
चौघांना जीवनरक्षा पदके
देशातील ३६ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले असून, त्यात सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथील गोविंद लक्ष्मण तुपे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले, तर तेजस ब्रिजलाल सोनावणे, मनोज सुधाकर ब्राह्मणे आणि नीलकांत रमेश हरिकांत्र यांना जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे.
पट्टीचे पोहणारे अशी ख्याती असलेले तुपे हे पुरात बुडालेल्यांचा शोध घेणे, जीव वाचविण्याचे काम करतात. १८ लोकांचा जीव त्यांनी वाचविला आहे. (विशेष प्रतिनिधी)