कौशिक, पांडेय, सावंत यांना राष्ट्रपती पदक; महाराष्ट्र पोलिस दलाला एकूण ६२ पदके
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 07:05 AM2024-01-26T07:05:53+5:302024-01-26T07:06:27+5:30
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पोलिस दलातील अतिरिक्त पोलिस महासंचालक निकेत कौशिक, मीरा-भाईंदर वसई-विरारचे पोलिस आयुक्त मधुकर पांडेय, ...
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रपोलिस दलातील अतिरिक्त पोलिस महासंचालक निकेत कौशिक, मीरा-भाईंदर वसई-विरारचे पोलिस आयुक्त मधुकर पांडेय, विशेष पोलिस महानिरीक्षक दिलीप सावंत आणि ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
पोलिस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील एकूण १,१३२ कर्मचाऱ्यांना शौर्य - सेवा पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये पोलिस दलासाठी १,०३८ पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला एकूण ६२ पदके मिळाली आहे. मुंबई पोलिस दलातील कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांचा पुरस्कार विजेत्यांत समावेश आहे.
नक्षलप्रभावित जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान
नक्षलप्रभावित जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेले लातूरचे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह १८ पोलिसांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये लातूरचे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, पोलिस कमलेश नैतम, शंकर बाचलवार, मुन्शी मडवी, सूरज चौधरी, मोहन उसेंडी, देवेंद्र आत्राम, संजय वाचमी, विनोद मडवी, गुरुदेव धुर्वे, दुर्गेश मेश्राम, हिराजी नेवरे, ज्योतिराम वेलाडी, माधव मडवी, जीवन नरोटे, विजय वड्डेटवार, कैलास गेडाम यांचा समावेश आहे.
मुंबई सीबीआयमधील ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुंबई विभागातील पाच अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले. पोलिस उपमहानिरीक्षक वीरेश प्रभू, पोलिस उपमहानिरीक्षक शारदा राऊत, अतिरिक्त पोलिस उपअधीक्षक अमित भारद्वाज आणि विधी अधिकारी मनोज चलादान, अशी त्यांची नावे आहेत. सीबीआयच्या ३१ अधिकाऱ्यांना पदक जाहीर झाले आहे.