राष्ट्रपती राजवटीचा म्हाडाच्या प्रकल्पांवर काहीही परिणाम नाही; अधिकाऱ्यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:24 AM2019-11-18T00:24:27+5:302019-11-18T00:24:35+5:30
म्हाडाकडून गोरेगावमधील मोतीलालनगर, बीडीडी चाळ पुनर्विकासासह मुंबई आणि कोकण विभागातील इतर प्रकल्पांना हिरवा कंदील
मुंबई : राज्यामध्ये लागू झालेल्या राष्टपती राजवटीचा म्हाडातर्फे सुरू असलेल्या कोणत्याच प्रकल्पावर परिणाम होणार नसल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. म्हाडाकडून गोरेगावमधील मोतीलालनगर, बीडीडी चाळ पुनर्विकासासह मुंबई आणि कोकण विभागातील इतर प्रकल्पांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रकल्प रखडतील अशी चर्चा बीडीडी चाळ आणि मोतीलाल नगर येथील रहिवाशांच्या मनामध्ये होती. यामुळे अनेक रहिवाशांनी शंका निरसन करण्यासाठी थेट म्हाडा कार्यालयामध्ये धाव घेतली. सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम असल्याने राज्यातील घडामोडींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम प्रकल्पांवर होणार का, याची गृहनिर्माण क्षेत्रामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र म्हाडा प्राधिकरणाच्या मान्यता मिळालेल्या आणि मार्गी लागलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेत कोणतीही बाधा उद्भवणार नसल्याचे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले स्पष्ट करण्यात आले आहे.
म्हाडाने प्रकल्पांना दिलेली मान्यता, प्राधिकरण बैठकीत झालेले ठराव, राज्य सरकार स्तरावर झालेली त्यांची नोंद, यासंदभार्तील घेण्यात आलेले निर्णय, स्थानिक रहिवाशांची साधलेला संवाद, संमती आदी प्रक्रिया पार पडल्या आहेत. म्हाडाकडील मार्गी लागलेल्या कोणत्याही प्रकल्पांमध्ये अडचणी येणार नसल्याची खात्री मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली आहे.
प्रक्रिया सातत्याने सुरूच होती
म्हाडाकडून रितसर मान्यता लाभलेले सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ज्येष्ठ अधिकाºयांनीही स्पष्ट केले आहे. या सर्व प्रकल्पांना मान्यता असून, ती प्रक्रिया सातत्याने सुरूच होती. त्यामुळे त्यात पुढचा टप्पा गाठण्यात अडचणी येणार नसल्याचेही या अधिका-यांनी सांगितले.