मुंबई : पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरसेवकांचीही बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे. सभागृहाबाहेरील यंत्रावर आपला ठसा उमटवल्यानंतरच सर्वपक्षीय नगरसेवकांना सभागृहाचे द्वार उघडणार आहे. त्यामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांची नोंद तत्काळ होणार आहे.मुंबई महापालिकेत २२७ नगरसेवक निवडून आले आहेत. जनतेचे प्रतिनिधी असल्याने त्यांचे प्रश्न नगरसेवकांना पालिका महासभेत मांडता येतात. अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळून प्रशासनाला धारेवर धरण्याची ताकद नगरसेवकांना या सभागृहानेच मिळवून दिली आहे. दर महिन्याला होणाऱ्या या बैठकांना हजेरी लावण्यासाठी नगरसेवकांना भत्ताही मिळतो. मात्र बरेच नगरसेवक महासभेला दांडी मारतात.तर, बहुतांश नगरसेवक सभागृहात येण्याआधी मस्टरवर सही करून पळ काढतात. सर्वच पक्षांत असे दांडीबहाद्दर नगरसेवक असल्याने त्यांना चाप बसावा, अशी गटनेत्यांची इच्छा होती. त्यामुळे नगरसेवकांच्या बायोमेट्रिक हजेरीच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. या प्रस्तावाला गुरुवारी पालिका महासभेतही मंजुरी मिळाली.सही करून काढतात पळनगरसेवकाला प्रत्येक महासभेला हजेरी लावण्यासाठी दीडशे रुपये मिळतात. एका महासभेवर १० ते १५ हजार रुपये खर्च करण्यात येतो. तरीही अनेक नगरसेवक महासभेला दांडी मारतात. तर, बहुतांश नगरसेवक सभागृहात येण्याआधी मस्टरवर सही करून पळ काढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच आता त्यांना चाप बसवण्यासाठी सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी व बाहेर जाताना बायोमेट्रिक हजेरी नगरसेवकांना बंधनकारक करण्यात आली आहे.
दांडी मारणाऱ्या नगरसेवकांना चाप; बायोमेट्रिकचे बंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 5:49 AM