Join us

सेलिब्रिटींना ट्विट करण्यासाठी भाजपकडून दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:07 AM

काँग्रेसचा आराेप; गृहमंत्र्यांकडे चाैकशीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या ...

काँग्रेसचा आराेप; गृहमंत्र्यांकडे चाैकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युत्तराची आता गुप्त वार्ता विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी याबाबत आदेश दिले आहेत. दरम्यान, ट्विट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) सेलिब्रिटींना प्रवृत्त केले होते का, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? याची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. त्याबाबत त्यांनी शिष्टमंडळासह ऑनलाइन झूम मीटिंग घेतली.

सावंत म्हणाले, देशभरात विषेशतः पंजाब, हरियाणा, राजस्थान व पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असताना मोदी सरकार या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी शेतकऱ्यांचे दमन करत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तिगत मतावर केंद्र सरकार प्रत्युत्तर देत नसताना रिहाना या अमेरिकन पॉपस्टारने केलेल्या ट्विट विरोधात केंद्र सरकारने उत्तर दिले व त्यानंतर त्यासारखे अनेक ट्विट हे बॉलीवूड व क्रीडा क्षेत्रातल्या सेलिब्रिटींनी केले होते.

कोणी व्यक्तिगत पातळीवर आपले मत व्यक्त करत असेल तर त्या व्यक्तीचा तो संविधानिक अधिकार आहे. परंतु जर दबावाखाली त्यांच्याकडून हे करवून घेतले गेले असेल तर त्याचा निश्चितच विरोध होणे गरजेचे आहे. अक्षयकुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्विट सयामी जुळ्या व्यक्तीने केल्याप्रमाणे साम्य आहे. यातूनच भाजपने त्यांच्याकडून स्क्रिप्ट देऊन हे ट्विट करवून घेतले या शंकेला बळ मिळते. अभिनेता सुनील शेट्टी यांच्या ट्विटमध्ये मुंबई भाजपचा उपाध्यक्ष हितेश जैन या व्यक्तीला उल्लेख आहे. यातून भाजपचे कनेक्शन होते का, याची चौकशी करण्याची गरज निर्माण होते. तसेच गरज भासल्यास या सेलिब्रिटींना संरक्षण व मानसिक आधार द्यावा. कोरोनाबाधित असतानाही गृहमंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून वेळ दिला. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी आज, साेमवारी ऑनलाइन चर्चा केली. शिष्टमंडळात सचिन सावंत यांच्याबरोबर प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सरचिटणीस डॉ. गजानन देसाई व विनय खामकर हे उपस्थित होते.

.............