Join us

भाईंदर एसी लोकल बंद करण्यासाठी दबावतंत्र? आणखी लोकल वाढवा, प्रवाशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 14:31 IST

अशा दबावाला बळी न पडता उलट रेल्वे प्रशासनाने या मार्गावर आणखी एसी लोकल वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :पश्चिम रेल्वेने सकाळी ८:२४ वाजता सुरू केलेल्या भाईंदर-चर्चगेट फास्ट एसी लोकलमुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र, राजकीय दबावानेच ही एसी लोकल आता बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती आता समोर येत आहे. अशा दबावाला बळी न पडता उलट रेल्वे प्रशासनाने या मार्गावर आणखी एसी लोकल वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लोकलमध्ये एसी सेवांची वाढ करण्याची मागणी सतत वाढत आहे. भाईंदरमधून ८:२४ ला सुटणाऱ्या एसी लोकलमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची संधी मिळते. विरार लोकलमध्ये चढता न येणारे प्रवासी या लोकलचा मोठ्या संख्येने लाभ घेतात. सकाळी ८ च्या साध्या लोकलला आता ३ डबे वाढवल्याने त्याचाही फायदा भाईंदरपुढील प्रवाशांना होत आहे. त्यामुळे ही एसी लोकल बंद न करता येथून आणखी एसी लोकल वाढविण्याची मागणी आता होत आहे. तसेच ही सेवा बंद केल्यास प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, असा सूरही आता व्यक्त होत आहे.

एसी लोकलचे भाडे प्रती किमी ८४ पैसे असून जवळपास नॉन एसी बेस्ट बसच्या पास इतकेच आहे, जे ८० पैसे प्रती किमी आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.

उपनगरीय सेवांमधील कोणताही बदल सकारात्मक आणि नकारात्मक अभिप्रायाद्वारे नेहमीच स्वागतार्ह आहे. पण आम्ही आमची मागणी नेहमीच रेल्वे प्रशासनासमोर मांडत असतो. एसी लोकलमुळे निश्चितच प्रवाशांना फायदा होत आहे. परंतु रेल्वेने नजीकच्या भविष्यात एसी सोबत साध्य लोकलदेखील वाढवाव्यात. - केतन शाह, सदस्य, झेडआरयूसीसी

मी नायगाववरून रोज भाईदरला उतरून ८:२४ ची एसी लोकल पकडतो. या लोकलमुळे आम्हाला आरामदायक प्रवास मिळत असून रेल्वेने आणखी एसी लोकल वाढवल्या पाहिजेत. - संजय तिवारी, प्रवासी

टॅग्स :एसी लोकलपश्चिम रेल्वे