Join us

बीएलओची कामे करण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून शिक्षकांवर दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:06 AM

मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना जुंपलेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना जुंपण्यात आले असून, ही कामे ...

मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना जुंपले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना जुंपण्यात आले असून, ही कामे करण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या याद्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आल्या असून, पोलीस ठाण्यामार्फत शिक्षकांना संपर्क साधण्यास सांगितले जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी आयोगाच्या आदेशान्वये मुंबईतील शाळांमधील शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

शिक्षक ऑनलाइन शिकविण्याचे काम करीत आहेत. त्याचवेळी ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रमही वेळेत पूर्ण करणे शिक्षकांना बंधनकारक आहे. अशावेळी अध्यापन करावे? की निवडणुकीची कामे? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. निवडणुकीची कामे न स्वीकारल्यास मतदान नोंदणी अधिकारी स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून शिक्षकांना कामावर हजर राहण्याच्या नोटिसा पाठवीत असल्याचा आरोप भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केला आहे तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०चे कलम ३२ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या धमक्या शिक्षकांना दिल्या जात आहेत. ही कामे तातडीने रद्द करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.