Maharashtra Lok Sabha election results 2024: मुंबई : मराठी विरुद्ध गुजराती राजकारण आणि सर्वाधिक तीन लाख मतदार असलेल्या मानखुर्द शिवाजी नगरवर होणाऱ्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील २८ हजार ८६१ मताधिक्याने विजयी झाले आहेत. येथे जातीचे राजकारण चालत नाही, हेच मतदारांनी दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले. त्यांच्याशी केलेली बातचीत.
मुंबई उत्तर पूर्वमध्ये शिवसेनेचे तुम्ही पहिले खासदार... मी हे माझे भाग्य समजतो. या मतदारसंघात मी आमदारही होतो. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार होण्याचा मान मिळाला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धवसेना आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या साथीने खासदार होण्याचा मान मिळाला. आता फक्त आश्वासने पूर्ण करायची आहेत.
पंतप्रधान मोदींच्या रोड शोनंतर भाजपचा विश्वास वाढला होता? पराभवाची भीती होती म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित केला गेला होता. एकीकडे रोड शोचा जल्लोष, तर दुसरीकडे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचा आक्रोश होता. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी स्वतःवर फुलांचा वर्षाव करून घेण्याचा हव्यास रोड शोमध्ये दिसला. जनता मूर्ख नाही. तिने ते बघितले आणि त्यास निकालातून उत्तरही दिले. मोदींचा रोड शो काहीही बिघडवू शकला नाही.
निवडणुकीच्या निकालाकडे कसे पाहता? मी अनेक निवडणुका बघितल्या. यापूर्वी आई, वडिलांनी लढविलेल्या निवडणुकाही पाहिल्या. मात्र यावेळेच्या निवडणुकीत घाणेरडे राजकारण पाहायला मिळाले. प्रतिस्पर्धी खालच्या थराला गेले होते. पराभवाच्या भीतीने खोटे आरोप, दावे करण्यातच त्यांचा वेळ गेला. आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाईसाठी दबाव आणला गेला. काहींना मारहाण केली गेली. परंतु आमच्या मागे मतदारांचा विश्वास असल्याने आम्ही दडपशाहीला जुमानले नाही. अखेर सत्याचाच विजय झाला.
मराठी चेहरा म्हणून मतदार पाठीशी? आम्ही मराठी-गुजराती राजकारण केले नाही. विरोधकांना काही मुद्दे नसल्याने त्यांनीच जातीचे राजकारण केले. सुरुवातीला मराठी-गुजराती करूनही हाती काही न लागल्याने त्यांनी मानखुर्द शिवाजी नगरची बदनामी केली. मी ड्रग्ज, मटका, गुटखा अड्डे चालवतो असे खालच्या पातळीवरचे आरोप करण्यात आले. मला सर्व जाती-धर्मातील लोकांनी मतदान केले आहे. मराठी, गुजराती, मुस्लीम बांधवांसह सर्वांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला. इथे जातीचे राजकारण चालत नाही, हे मतदारांनीच त्यांना दाखवून दिले.