मुंबई : सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणारे व रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना दंड करण्यासाठी क्लीन अप मार्शलची फौज महापालिकेने तैनात ठेवली आहे. मात्र, काही क्लीन अप मार्शल हे प्रसारमाध्यम प्रतिनिधी व नागरिकांशी गैरवर्तणूक करीत असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मार्शलची ओळख दर्शविणारा कोट तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईतील रस्ते, सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांना शिस्त शिकवण्यासाठी क्लीन अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, यापैकी काही मार्शल नागरिकांशी हुज्जत घालणे, दमदाटी करणे व दंडाच्या रकमेत तडजोड करीत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. त्यामुळे मार्शलची नियुक्ती अनेकवेळा अडचणीत आली आहे. मात्र, कोरोना काळात नागरिकांना मास्क लावण्याचे धडे देण्यासाठी पालिकेला पुन्हा मार्शलचाच आधार घ्यावा लागला आहे.
सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी दोनशे रुपये दंड केला जातो. मात्र, काही ठिकाणी बोगस मार्शलचा सुळसुळाट आहे. तर, काही मार्शल दंड वसूल करताना गैरवर्तणूक करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापौरांनी घनकचरा खात्याचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि क्लीन अप मार्शल यांची महापौर निवासस्थानी शनिवारी बैठक बोलावून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चा केली.
अशी कळणार मार्शलची ओळख
क्लीन अप मार्शल परिधान करीत असलेल्या गणवेशावरील कोटवर संबंधित मार्शलची ओळख दर्शविणारा क्रमांक, संबंधित विभागाचे नाव, क्लीन अप मार्शलचे नाव, संबंधित ठेकेदाराची माहिती, कोटच्या समोरील आणि मागील बाजूस ठळक अक्षरात वाचता येईल, या पद्धतीने दर्शविणारी असावी. यामुळे बोगस मार्शलचा शोध लागेल, अशी सूचना महापौरांनी केली. या पद्धतीचा कोट पुढील आठवड्यात सादर करावा, यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.