मनाेहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांवर असलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सर्व श्रम पणाला लावून कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग रोखण्याचा ठाम विश्वास पालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक ६१ च्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका राजुल पटेल यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केला.
शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून त्यांची ओळख असून राज्याचे परिवहन मंत्री व विभागप्रमुख ॲड. अनिल परब यांच्याबरोबर विभाग क्रमांक ४ च्या महिला विभाग संघटक म्हणूनही त्या गेली आठ वर्षे कार्यरत आहेत. मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा २०१२ साली त्यांनी पण केला होता. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मग त्यांनी सात वर्षांनी त्यांनी पायात चप्पल घातली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बाल चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी माझाही छोटासा प्रयत्न यशस्वी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कोरोना रोखण्यासाठी मुंबईकर जनतेनेसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या त्रिसूत्री कार्यक्रमाला साहाय्य करणे गरजेचे आहे. वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, मास्क लावणे यासारखे नियम पाळले, तर कोरोनावर निश्चितच विजय मिळवता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षाने २०११-१२ नंतर दुसऱ्यांदा मुंबईसारख्या दाट लोकसंख्या असणाऱ्या महानगरपालिकेच्या ‘सार्वजनिक आरोग्य समिती’च्या अध्यक्षपदासाठी राजुल पटेल यांची गेल्या ९ एप्रिल रोजी निवड झाली. आपल्या आरोग्य समिती अध्यक्षपदाच्या काळात कोरोनामुक्त मुंबई करण्याचा संकल्प त्यांनी केला आणि कोणत्या योजना, संकल्प राबवणार याबद्दल आपली भूमिका ‘लोकमत’कडे विषद केली. कोविड-१९ सारख्या महाभयंकर साथीच्या आजाराशी महाराष्ट्र शासन व महापालिका सर्व पातळीवर लढत असताना हे अत्यंत जबाबदारीचे पद मिळाले आहे याचे भान राखूनच कामाला सुरुवात केल्याची माहिती त्यांनी दिली. केईएम, सायन या सारख्या महापालिकेच्या रुग्णालयात संपूर्ण भारतातून गरीब जनता उपचारासाठी येत असते, त्यातून या महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, इतर स्टाफ यांच्यावर अधिक भार पडत आहे. त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी अध्यक्षपदाच्या कालखंडात नक्कीच प्रयत्न करणार आहे तसेच महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे आधुनिकीकरण करून तेथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना अद्ययावत सुविधा उपलब्ध होतील यासाठीही पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य समितीच्या माध्यमातून समितीच्या सदस्यांपासून ते सामान्य रुग्णांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे निराकरण करण्याचा प्रयत्न राहील. तसेच महापालिकेच्या दवाखान्यात व आरोग्य केंद्रात राबविण्यात येणारे क्षयरोग, कृष्ठरोग, हिवताप, या सर्वांचे निर्मूलन करण्यासोबत बरेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम व जनजागृतीचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेची सध्या कार्यान्वित नसलेली आरोग्य केंद्रे, प्रसूतिगृहे लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणे, तसेच गरीब रुग्णांसाठी महापालिकेची डायलिसिस सेंटर्स प्रत्येक महापालिकेच्या प्रभाग क्षेत्रात उपलब्ध व्हावीत यासाठी आपल्या कारकिर्दीत प्रयत्न करणार असल्याचे राजुल पटेल म्हणाल्या.
मुंबईसारख्या महानगरात रोज होणारे ऑपरेशन्स, रस्ते अपघात किंवा तत्सम प्रकारचे अपघात, इमारत कोसळल्यावर आणि आग लागल्यावर जखमी होणारे रुग्ण यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. आजही अनेक रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतो. यासाठी अतिदक्षता विभाग व रक्तपेढी सुरू करण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
----------------